लांजा : मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावर वाकेड, वेरळ आदी ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत .त्यामुळे पक्क्या स्वरूपात तयार केलेल्या महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.लांजा तालुक्याच्या अंतर्गत वाकेड ते मठ या दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेल्या स्थितीत होते आणि त्यामुळेच त्याचा फटका हा मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जनतेला लोकांना बसत होता. या पार्श्वभूमीवर लांजा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला मे महिन्यात सुरुवात झाली होती. महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले होते त्या त्या ठिकाणी खड्डे बुजवून तर काही ठिकाणी खराब झालेल्या रस्त्याचे पक्क्या स्वरूपात डांबरीकरण करण्यात आले होते. यामध्ये वाकेड ते तळेकांटे या अंतरादरम्यानच्या कामासाठी चार कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आला होता. त्यातून मुंबई गोवा महामार्गाची काही ठिकाणी डागडुजी तर काही ठिकाणी पक्क्या स्वरूपात रस्ता तयार करण्यात आला होता.
मात्र पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात होण्याअगोदरच मान्सूनपूर्व सरींच्या स्वरूपात पडलेल्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर वाकेडसह वेरळ व अन्य भागात पुन्हा एकदा खड्डे पडले आहेत