T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने कॅनडाचा पराभव केलाय. 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेनं 17.4 षटकांत विजय मिळवला.
टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेनं कॅनडाचा 7 विकेट्सनं पराभव केलाय. या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे त्यांच्या बाजूनं गेला. लक्ष्याचा पाठलाग करताना ॲरो जोन्सनं अमेरिकेसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीनं 94* धावा केल्या. याशिवाय अँड्रिज गसनं 46 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची (58 चेंडू) उत्कृष्ट भागीदारी केली.
*कॅनडाचे गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले :*
प्रथम फलंदाजी करताना कॅनडा संघानं 20 षटकांत 5 गडी गमावून 194 धावा केल्या. नवनीत धालीवालनं संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 61 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अमेरिकेनं 17.4 षटकांत विजय नोंदवला. अमेरिकेच्या फलंदाजांसमोर कॅनडाचे गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
*अमेरिकेची फलंदाजी…*
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरच्या रूपानं पहिली विकेट गमावली, जो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोनांक पटेल आणि अँड्रिज गस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (37 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार पटेलच्या विकेटनं संपुष्टात आली. मोनांकनं 16 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीनं 16 धावांची खेळी केली. यानंतर अँड्रिज गूस आणि ॲरॉन जोन्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची (58 चेंडू) भागीदारी केली. अँड्रिजनं 46 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 65 धावांची खेळी केली. जोन्सनं 94* धावा करत नाबाद राहिला.
*नवनीत धालीवाल खेळी व्यर्थ…*
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या कॅनडानं चांगली सुरुवात केली. आरोन जॉन्सन आणि नवनीत धालीवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावा (32 चेंडू) जोडल्या. यानंतर संघानं 8व्या षटकात परगट सिंगच्या रूपानं दुसरी विकेट गमावली. नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अप्रतिम भागीदारी करत 62 धावा केल्या. ही भागीदारी 15व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवनीत धालीवालच्या विकेटनं संपुष्टात आली. नवीननं 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 61 धावा केल्या. त्यानंतर 18 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर निकोलस किर्टनच्या रूपानं संघाने चौथी विकेट गमावली. त्यानं 31 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 51 धावा केल्या. यानंतर 19व्या षटकात धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या दिलप्रीत सिंगच्या रूपानं संघाने पाचवी विकेट गमावली. दिलप्रीतनं 5 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 11 धावांची खेळी केली. शेवटी श्रेयस मोव्वानं 32* धावांची शानदार खेळी खेळली. संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मात्र कॅनडाला या सामन्यात 7 विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागलाय.
*अमेरिकेचा संघ :* स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (यष्टीरक्षक/कर्णधार), अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रावलकर.
*कॅनडाचा संघ :* आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक), दिलप्रीत सिंग, साद बिन जफर (कर्णधार), निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम सना, जेरेमी गॉर्डन.
*सर्वात मोठा विश्वचषक :* यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी टी-20 विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यात वेस्ट इंडिजच्या सहा तर अमेरिकेच्या तीन ठिकाणी सामने होणार आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक असून एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. इंग्लंड संघ गतविजेता आहे. 2022 मध्ये पाकिस्तानचा पराभव करुन त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं.
*टी-20 विश्वचषक 2 जून (भारतीय वेळेनुसार) ते 29 जून दरम्यान होणार आहे.*
यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. यात यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका व्यतिरिक्त भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, इंग्लंड, आयर्लंड, कॅनडा, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि नामिबियाचे संघ सहभागी होत आहेत.
*T20 विश्वचषकाचं स्वरुप काय :*
▪️पहिल्या फेरीत प्रत्येकी पाच संघांच्या गटात 20 संघ सामने खेळतील. भारताला अ गटात ठेवण्यात आलंय.
▪️प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील.
सुपर-8 फेरीत आठ संघांची प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागणी केली जाईल.
▪️सुपर-8 फेरीतील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
▪️दोन उपांत्य फेरीतील विजेते 29 जून रोजी टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भिडतील.
▪️भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.