
रत्नागिरी- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात होणारी बंडखोरी मोडून काढण्यासाठी ना. चव्हाण यांनी कंबर कसली आहे. बुधवारी रत्नागिरी भाजप कार्यकर्त्यांची बंद दाराआड चर्चा करून कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. या भेटीवेळी ना. उदय सामंत व किरण सामंत यांनी चव्हाण यांची भेट घेतली. त्यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होणार हे निश्चित होते. बाळ माने यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आणि त्याच दिवशी भाजपचे नेते मंत्री रविंद्र चव्हाण हे रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका हॉटेल मथुरा येथे बोलावल्या होत्या. यावेळी विधानसभानिहाय बैठका पार पडल्या. काही प्रमुख पदाधिकार्यांशी वन-टू-वन संवादही त्यांनी साधला.
या निवडणुकीत आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे, त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला ना. रविंद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. कोण कुठे गेलं तरी पक्षावर निष्ठा असलेले कार्यकर्ते आजही पक्षात आहेत. आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे कोणतीही नाराजी न ठेवता सर्वांनी एकदिलाने काम करा, पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन सर्वांनी केले पाहिजे, अशा सूचना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.
.
