नरेंद्र मोदी-शरद पवार भेटले की ‘ती’ गोष्ट हमखास घडणार, उद्धव ठाकरे कमालीचे नाराज…

Spread the love

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी पाच तासांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार की नाही, हा सगळ्यांच्याच औत्सुक्याचा विषय बनला आहे. एकीकडे पवार हे विरोधकांच्या ‘इंडिया’ या नवीन आघाडीच्या पायाभरणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांनी जाहीरपणे मोदींबरोबर व्यासपीठावर जाणे हे विरोधकांच्या आघाडीला सुरूंग लावणारे ठरणार, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांचे; तसेच या संस्थेशी संबंधित असल्याने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव आहे. पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी संबंधित संयोजकांनी आपल्याच माध्यमातून संपर्क साधला होता, असे जाहीर करून पवार यांनी याबद्दलचा वाद सुरू केला आहे. नव्याने झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील अनेक जणांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ते या समारंभाला उपस्थित राहणार किंवा कसे याबाबत त्यांच्या समर्थकांसह सर्वच राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंना वाटते, पवारांनी कार्यक्रम टाळावा
टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघे मंगळवारी एकाच मंचावर येणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे चांगलेच खटकत असल्याचे समजते. शरद पवार यांनी सोहळ्याला हजेरी लावता कामा नये अशी त्यांची इच्छा असून तसा निरोप त्यांनी पवारांपर्यंत पोहोचवल्याचे खात्रीलायकरित्या समजते. पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये अशी उघड भूमिका ठाकरे यांच्या पक्षाने घेतली आहे. मोदी आणि पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले की, त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होणार आणि त्याचा फटका आघाडीला बसणार, असे उद्धव ठाकरे यांना वाटते. साहजिकच पवारांनी हा कार्यक्रम टाळावा, असे त्यांचे म्हणणे असल्याचे कळते.

… तर शरद पवारांना आघाडीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही
‘वास्तविक पाहता ‘इंडिया’ ही आघाडी ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ या एकाच मुद्द्यावर झालेली असताना मोदींच्याच सत्काराला जर पवार जात असतील, तर त्यांना या आघाडीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही’, असे काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री व सध्या आमदार असलेल्या नेत्याने सांगितले.

काँग्रेस पक्षाने फार नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही

दुसऱ्या बाजूला, ‘काँग्रेस पक्षाने फार नाकाने कांदे सोलण्याची गरज नसून या कार्यक्रम पत्रिकेत माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव आहे. तसेच या संस्थेचे मुख्य पदाधिकारी रोहित टिळक हेदेखील अधिकृतरित्या अजूनतरी काँग्रेस पक्षातच आहेत. त्यामुळे पुरस्कार देणारी संस्थाच मुळात काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याने पवारांनी या कार्यक्रमाला जावे किंवा जावू नये हे सांगण्याचा काँग्रेस पक्षाला कोणताही नैतिक अधिकार नाही,’ असे एका पवारसमर्थक आमदाराने सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार विरोधकांच्या आघाडीला सुरूंग लावणार?

शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे याही अजित पवार यांच्या बंडानंतर जितक्या आक्रमक होत्या, तितक्या आक्रमक दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया या केंद्रात मंत्री होणार असल्याचे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज छातीठोकपणे सांगत असतात. मात्र, याला कोणताही दुजोरा भाजप वा स्वतः सुप्रिया अथवा शरद पवार यांच्याकडून मिळू शकलेला नाही. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विरोधकांच्या आघाडीला सुरूंग लावणार की, आपली भूमिका शेवटपर्यंत अनपेक्षित ठेवण्याची परंपरा कायम ठेवून कार्यक्रमापासून दूर राहणार याचीच सध्या चर्चा सुरू आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page