नोंदीत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य आणि धनादेश वाटप,शासनाच्या योजनेसाठी कुणीही पैसे मागत असेल तर त्याच्यावर कारवाई- पालकमंत्री डॉ. उदय सामंत….

Spread the love

रत्नागिरी- शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. त्या समजून घेणे गरजेच आहे. अशा योजनांच्या नावावर कुणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि नंबर सांगा. त्याच्यावर कारवाई केली जाईल. पैसे मागणाऱ्याबरोबरच पैसे देणाराही तितकाच दोषी आहे, त्यामुळे तुमच्यासाठी असणाऱ्या योजनांसाठी पैसे देऊ नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
           
येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. कार्यक्रमासाठी सुदेश मयेकर, बाबू म्हाप, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, शासनाच्या कामगार विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचतात हे आज इथे झालेल्या गर्दीवरुन समजते. गैरसमज पसरविणारे काहीजण असतात. त्यांना माझे सांगणे आहे, मी हा कार्यक्रम थांबविला नव्हता, भ्रष्टाचार थांबवला होता. गृहपयोगी संच हा जवळपास 10 हजार रुपयांचा आहे. तो मिळवून देण्यासाठी पाचशे ते दीडहजार रुपये घेतात, अशी बातमी माझ्या कानावर आली होती.

तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या पैशांवर कोणीही डल्ला मारत असेल तर, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. अशा लोकांची तक्रार द्या, शंभर टक्के जेलमध्ये टाकले जाईल. मूल जन्माला आल्यानंतरही व दुर्दैवी घटना घडल्यानंतरही मदत देणारी ही एकमेव योजना आहे. अशी योजना समजून घेतली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तहयात सुरु राहणार आहे. ती थांबणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले. विष्णू विश्राम रावणंग, प्रणाली प्रकाश ताम्हणकर, प्रमोदकुमार रामगोपाळसिंह बघेल, अश्विनी अजय अंबेरकर, प्रतिभा परशुराम हंगीरेकर या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे धनादेश वितरण करण्यात आले. त्याचबरोबर मनिषा अनंत भातडे, कामिनी मंगेश मांडवकर, वेदिका योगेश जाधव, धनाजी आण्णा साठे, प्रकाश मधुकर झोरे यांना प्रातिनिधिक स्वरुपात गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास लाभार्थ्यांची मोठी गर्दी होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page