*नागपूर-* मुकेश अंबानी यांच्या घरासमोर धमकीचे पत्र व मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचा असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भातील पत्र देखील फडणवीस यांना लिहिले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वाझे यांच्या याच आरोपावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
*काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?…*
फडणवीस म्हणाले की, सचिन वाझे यांनी जो काही आरोप केला आहे. तसेच मला जे पत्र पाठवले असा दावा केलेला आहे, तो मी माध्यमांमध्ये पाहिला आहे. अद्याप माझ्या हातात पत्र आलेले नाही. दोन दिवसांपासून मी नागपुरात आहे. सगळं पाहिल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन. पण जे समोर येईल त्यावर आम्ही योग्य ती चौकशी करू, असं फडणवीस म्हणाले आहेत.
*देशमुखांनी सर्व आरोप फेटाळले…*
सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांच्यावर भाजपा तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तर खुद्द देशमुख यांनी वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यामुळेच अशा प्रकारचा कट रचला जातोय, असा दावा देशमुख यांनी केला.