
क्रीडा क्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन करण्यात आले. डेनिस डिसुझा यांनी क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा विज्ञान यातील संधींविषयी माहिती दिली. बारावीनंतर या क्षेत्रात अनेक करिअर वाटा उपलब्ध आहेत. २०३६ पर्यंत ऑलिम्पिकमुळे नोकरीच्या संधी वाढणार आहेत. विविध लीगमुळेही मनुष्यबळाची मागणी वाढेल, असे त्यांनी सांगितले….
मुंबई : दहावी-बारावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, त्यासाठी कशी तयारी करायची यांसह विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आजपर्यंत अनेक करिअर मार्गदर्शन शिबिर झाली त्यातील महत्त्वाच्या सूचना पुढील लेखामध्ये आहेत. आत्तापर्यंत झालेल्या विविध चर्चासत्रांमध्ये यामध्ये विविध करिअरसंधींविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यातील क्रीडा क्षेत्रातील संधी या विषयावरील सत्राचा वृत्तांत…
क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी म्हटले की, केवळ खेळाडू असाच समज होतो. पण खेळाडूंपलीकडेही क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा विज्ञान या दोन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून असंख्य संधी आज उपलब्ध आहेत, अशी माहिती देत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे डेनिस डिसुझा यांनी ‘टाइम्स एज्युकेशन एक्स्पो’साठी जमलेल्या पालकांचे कुतुहल चाळवले. बारावीनंतर या क्षेत्रात असलेल्या असंख्य करिअरवाटांची ओळख त्यांनी विद्यार्थी व पालकांना करून दिली.
क्रीडा विज्ञान : अ ॅनाटॉमी आणि सायकॉलॉजी तज्ज्ञ, स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, एक्सरसाइज सायंटिस्ट, ॲकॅडमिक्स, कायनेसीओलॉजीस्ट, प्लेयर मॉनिटरिंग, आँत्रप्रुन्यअर
पात्रता – क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम करण्यासाठी कुठल्याही शाखेतून बारावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेशपरीक्षा म्हणून स्पोर्ट्स मॅनेजमेंट टेस्ट देणे अनिवार्य आहे. तर क्रीडा विज्ञान या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
पदवी व पदव्युत्तर शिक्षण बीएसएम : बॅचलर इन आर्ट्स किंवा कॉमर्स याप्रमाणे बॅचलर इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट ही पदवी घेता येईल (कालावधी तीन वर्षे). त्यानंतर एमएसएम म्हणजेच मास्टर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट (कालावधी दोन वर्षे) ही पदवी घेता येईल.
बीएसएस : बॅचलर इन स्पोर्ट्स सायन्स (कालावधी तीन वर्षे) व मास्टर इन स्पोर्ट्स सायन्स (कालावधी दोन वर्षे)
क्रीडा व्यवस्थापन आणि नोकरी – क्रीडा व्यवस्थापनाच्या माध्यमातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, हे पटवून देताना डिसुझा यांनी आयपीएलचे उदाहरण दिले. या एका लीगमुळे नोकरीच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा १२ लाख संधी तयार होतात. यात टुरिझम, ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी, मीडिया व कंटेंट क्रिएशन, डिजिटल-टेक स्पेस अशा विविध क्षेत्रांमधील नोकऱ्यांचा समावेश आहे. २०३६ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन भारतात करण्याचा मानस आहे. त्यावेळी आत्ता क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करणाऱ्या किमान तीन लाख लोकांना नोकरीच्या संधी आहेत, असेही ते म्हणाले.
विविध लीगचा पर्याय – भारतात सध्या लोकप्रिय असलेली आयपीएल ही जगातील सर्वांत श्रीमंत लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिवसाला तब्बल १६ कोटींपेक्षा अधिक लोक आयपीएल बघतात. त्याशिवाय, प्रो कबड्डी लीगला साडेचार ते पाच कोटींचा प्रेक्षकवर्ग आहे. ‘आयएसएल’ लाही असाच प्रतिसाद आहे. येत्या काळात आणखी नवनव्या क्रीडाप्रकारांच्या लीग सुरू होत आहेत. त्यांच्या आयोजनासाठी क्रीडा व्यवस्थापन या विषयात प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची गरज असेल. तसेच विविध संघांसाठी क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा विज्ञान या क्षेत्रांमधून शिक्षण घेतलेल्यांची गरज उद्भवणार आहे, असे डिसुझा यांनी स्पष्ट केले.