नेरळ : सुमित क्षीरसागर कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी पाटील यांची दिनांक १९ जानेवारी रोजी जयंती असल्याने आगरी समाज संघटनेकडून हि जयंती उत्साहात साजरी करत हुतात्मा हिराजी पाटील याना अभिवादन करण्यात येते. या प्रसंगी आगरी समाज संघटना कर्जत तालुका यांच्याकडून माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद पक्षप्रतोद अशी अनेक पदे भूषविलेल्या सावळाराम जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देत त्यांना सन्मानित करण्यात आले. कर्जत तालुक्यातील मनिवली येथील क्रांतिकारक हिराजी पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी बलिदान दिले. तेव्हा या हुतात्म्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगरी समज संघटनेकडून हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी करत त्यांना अभिवादन करण्यात येते. दिनांक १९ जानेवारी रोजी आगरी समाज संघटनेकडून हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी धामोते येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहाच्या प्रांगण शेड व सभागृह परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर, माधवी जोशी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माधवी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर याप्रसंगी अभिवादन सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी मंचावर आमदार प्रशांत ठाकूर, आगरी समाज संघटना तालुकाध्यक्ष सुरेश टोकरे, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, माधवी जोशी युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवी जोशी, सरपंच महेश विरले, आगरी समाज संघटना माजी अध्यक्ष एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, अरविंद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगरी समाज संघटनेचे सचिव संतोष जामघरे यांनी केले ते म्हणाले कि समाजातील अनेक दात्यानी मदत केल्यामुळे याठिकाणी संरक्षक भिंत व प्रशस्त जागा उपलब्ध झाली. समाजबांधवांसाठी त्यांचे घरघुती मोफत कार्यक्रम करून देण्याची सोय अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी करून दिली आहे. यासह समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी अभ्यास केंद्र या ठिकाणी उभारण्याची इच्छा टोकरे यांनी व्यक्त केली असून त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी बोलताना सांगितले कि कुळकायदा हा पहिल्यांदा कुलाबा जिल्ह्यात लागू झाला. क्रांतिकारकांनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच लढा दिलेला नव्हता. तर त्यांनी त्याकाळी अंधश्रध्दे विरोधात देखील लढा दिला होता. देवीला कोंबड्या बकरे कापणे हे बंद करण्याचं काम भाई कोतवाल यांनी केलं होत. हुतात्मा हिराजी पाटील यांची जन्म तारीख मिळत नव्हती त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन साजरा होत होता मात्र त्यांची जयंती साजरी करता येत नव्हती मात्र ती आपण मिळवली. यासह देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली, त्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या हुतात्म्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची गरज आहे का ? आपण देशभक्त म्हणून दयायला हवे असे म्हणत कोळंबे यांनी निमंत्रण मागणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेरळचे माजी सरपंच, आगरी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद रायगडचे माजी पक्षप्रतोद, जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवलेले सावळाराम जाधव याना आगरी समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर याप्रसंगी बोलताना सावळाराम जाधव म्हणाले कि आगरी समाज संघटनेचे रोपटे आम्ही पूर्वी लावले होते मात्र आज या रोपट्याचा वटवृक्ष होताना आनंद वाटतोय. माझी कारगिर्द मोठी असल्याने आजवर अनेक ठिकाणी सन्मान मिळाला मात्र आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाने आपल्याला सन्मानित करणं हि खूप अभिमानाची बाब आहे. तर हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान याप्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत मांडले. ठाकूर म्हणाले कि आपण सर्वांनी समाज भवन उभे केले त्यासाठी जे प्रयत्न केले त्यामुळे समाजाला प्रेरणा मिळेल. कर्जत तालुक्यातील हुतात्म्यांचे कार्य पुढील पिढी पर्यंत कसे नेता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजाची सुंदर वास्तू उभी राहिली ही आदर्शवत असल्याचे देखील ठाकूर यांनी कौतुगोद्गार काढले.
जाहिरात
जाहिरात