होळीचा सण साजरा केला अन् घरी जाताना कार दरीत कोसळली; बहीण-भावाची आयुष्यभरासाठी ताटातूट; भावाचा मृत्यू तर बहिण गंभीर जखमी…

Spread the love

*नागपूर-* नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील टी-पॉईंटजवळील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री घडला. वर्ध्याहून नागपूरला परत येताना कार चालकाने चुकीच्या दिशेने गाडी वळवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. कारमध्ये एकूण पाच तरुण प्रवास करत होते. त्यापैकी अरिंजय अभिजित श्रावणे (१८) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम बाफना, हिमांशू बाफना आणि मानस बदानी (वय २०) हे तिघे वर्ध्यात होळी निमित्त गेटटुगेदरसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांनी अरिंजय आणि अक्षता यांना वर्ध्यातून सोबत घेतले. नागपूरकडे येताना चालकाने चुकून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली. चुकीच्या मार्गावर गेल्याचे लक्षात येताच तो गोंधळला आणि भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून २० फूट खाली कोसळली. या अपघातात अरिंजयचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण अक्षता गंभीर जखमी झाली.

इतर तिघांनाही दुखापती झाल्या असून सर्वांना तातडीने नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बूटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रतापराव भोसले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की, कार अत्यंत वेगात होती, त्यामुळे अपघात टाळता आला नाही. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. होळीचा, रंगपंचमीचा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या मित्रमंडळींवर काळाने घाला घातला. यात एकाच्या झालेल्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page