गणेशोत्सवातील धक्के कमी करण्याचा प्रयत्न…
वित्तसहाय्य न मिळाल्यास चौपदरीकरण रखडणार..
▪️रत्नागिरी : गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेले मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षीचा पावसाळा आणि त्यानंतर महामार्गाला पडणारे भले मोठे खड्डे आणि त्याची होणारी मलमपट्टी, ही आता परंपरा बनत चालली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम रत्नागिरी विभागातील ठेकेदाराला बँकिंग संस्थांकडून वित्तीय सहकार्य मिळाले तरच पुढील वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. अन्यथा काम अपूर्णतेचे हे ग्रहण सुटणे अवघड आहे. मात्र गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईकर गणेश भक्तांना दिलासा मिळेल, प्रवास करताना धक्के कमी बसतील अशी व्यवस्था शासनाकडून केली जात आहे. महामार्गावरील १८० किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्याचे आणि मोठे पॅच मारण्याचे काम येत्या १५ ऑगस्टनंतर सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
▪️मुंबई गोवा महामार्गाचे काम सातत्याने रखडत चालले आहे. मात्र त्यानंतर मंजूर झालेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले. कोकणवरच अन्याय का, असा सवाल करीत पत्रकारांनी दोन दिवसांपूर्वी बोंबाबोंब आंदोलनही केले. त्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर भागातील ९० किलोमीटर अंतरात असलेले खड्डे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९० किलोमीटर अंतरातील खड्डे आणि मोठे पॅच यांचे काम करण्यासाठी जोरदार हालचाली महामार्ग विभागाकडून सुरू झाल्या आहेत. पनवेल इंदापूर विभागाप्रमाणेच रत्नागिरी विभागातही सी टी बी तंत्राद्वारे रस्ता दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी उद्या शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांची महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचेही महामार्ग विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
▪️रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग चौपदरी करणाचे काम अपूर्ण आहे. त्यामध्ये आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड लांजा या दोन टप्प्यातील ९० किलोमीटर महामार्गावर अस्तित्वात असलेल्या जुन्या मार्गाची स्थिती भयावह आहे. आरवली भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तर निवळी ते हात खंबा भागात खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे. हातखंबा ते पालीपर्यंत रस्ता आणखीच खराब झाला आहे. पाली बाजारपेठेतील ५०० मिटर रस्ता पूर्ण बाद झालेला असून तेथे ५०० मिटर लांबीचा मोठा पॅच मारावा लागणार आहे.
▪️गेल्या काही दिवसांपासून रस्ते दुरुस्तीसाठी सी टी बी अर्थात सिमेंट ट्रिटेड बेस तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. खास वाहन आणि मशिनद्वारे खराब झालेल्या रस्त्याची माती दगड काढून त्याच जागी विशेष रसायनाचा वापर करून रस्ता दुरुस्ती केली जाते. त्यावर सिमेंटचा थरही दिला जातो. हे तंत्रज्ञान रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणार असून त्याबाबत उद्या शुक्रवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बोलावलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले.
▪️कांटे ते वाकेड दरम्यान महामार्ग चौपदरिकरणाचे काम हे हन इन्फ्रा ठेकेदार कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र या कंपनीला बँकांकडून प्रयत्न करूनही वित्त सहाय्य मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारकडून चौपदरिकरण कामासाठी ठेकेदार कंपनीला कामाच्या ४० टक्के रक्कम दिली जाते. तर १५ टक्के रक्कम ठेकेदार कंपनीची आणि उर्वरित ४५ टक्के रक्कम ही वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात ठेकेदार घेतात. या कामासाठी या ठेकेदार कंपनीला सुमारे ४० कोटी कर्जाची आवश्यकता आहे. मात्र खुप प्रयत्न करूनही वित्तसंस्थांकडून अद्यापही अर्थ सहाय्य ठेकेदारांना मिळालेले नसल्याने या भागातील चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. हे अर्थ सहाय्य मिळावे यासाठी आय एफ सी एल च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तसेच वर्षभरात चौपदरिकरण काम पूर्ण करण्याचे वचन कोकण वासियांना दिलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांचीही याबाबतची जबाबदारी वाढली आहे. मात्र वेळीच ठेकेदाराला कर्ज मिळाले नाही तर महामार्ग पूर्णत्वाचा वर्षभरानंतरचा मुहूर्त ही चुकेल की काय अशी भीती कोकणवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे