
सिंधुदुर्ग – खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश नारायण राणेंना देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणेंच्या लोकसभेवर विजयाला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजप खासदार नारायण राणे यांना समन्स बजावले.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या कोकण पट्ट्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राऊत यांनी निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या नारायण राणे यांनी भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा आरोप करत पुन्हा मतदानाची मागणी केली आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री राणे यांनी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे राऊत, दोन वेळा खासदार राहिलेले यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी निवडणुकीविरोधात याचिका दाखल केली.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणेंविरोधात समन्स जारी केले आहेत. त्यांना १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत हे समन्स बजावण्यात आले आहेत. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून निवडणुकीत विजय मिळवला असल्याचा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली होती. यावर आता न्यायालयाने नारायण राणेंना समन्स बजावले. यामुळे आता नारायण राणेंची खासदारकी धोक्यात आली आहे.