डीडी नॅशनलराष्ट्रीय प्रसारण वाहिनीवर ‘धरोहर भारत की- पुनरुत्थान की कहानी’ या माहितीपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहे.पहिल्या भागात देशातील मंदिरे आणि प्राचीन परंपरांचे पुनर्निर्माण कसे करण्यात आले हे दाखवले असून या मालिकेच्या दुसऱ्या भागात राष्ट्रीय स्मारके व राष्ट्रीय प्रतीकांचे अभूतपूर्व रूप पाहून मन रोमांचित आणि गौरवान्वित होते.
भारतीय परंपरांच्या प्रतीकांचे संरक्षण, प्राचीन संस्कृतीच्या भव्यतेचे पुनर्निर्माण भारत सरकारने कशाप्रकारे केले आहे याचे अवलोकन करण्यासाठी समस्त भारतीयांसाठी ‘धरोहर भारत की – पुनरुत्थान की कहानी’ या माहितीपटाचा पहिला भाग काल शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय प्रसारण वाहिनी डीडी नॅशनलवर प्रसारित करण्यात आला. तर दुसरा भाग आज १५ एप्रिल रोजी झाला. पहिल्या भागात देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती यांच्याशी निगडीत मंदिरे आणि मोठमोठ्या श्रद्धास्थानांच्या पुनर्निर्माणाची अत्यंत रोचक माहिती पहायला मिळाली.
नव्या भारताची झलक
माहितीपटाच्या पहिल्या भागात दर्शकांना नव्या भारताचा फेरफटका मारायला मिळतो. ज्यामध्ये भारताचा आत्मा, भारताची संस्कृती, भारताचे अध्यात्म आणि भारताचा वारसा नव्याने सजलेला अनुभवायला मिळत आहे. ‘धरोहर भारत की’ या मालिकेत सोमनाथ पासून केदारनाथपर्यंत झालेल्या पुनर्निर्माणाची कहाणी विषद केली आहे.
सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिरावर १७ वेळा आक्रमकांनी हल्ले केले. अतोनात संपत्ती लुटली. कित्येक वेळा मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू आजदेखील मंदिराच्या शिखरावर डौलाने फडकणारा भगवा ध्वज आमच्या श्रद्धा आणि आस्था अभिमानाने वृद्धिंगत करत आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करत शुभारंभ केला होता. याचे फलित म्हणजे देशाच्या नव्या पिढीला आपले पुरातन वैभव पहाण्याची संधी प्राप्त झाली आहे.
उज्जैन येथे महाकाल लोक निर्मिती
ज्या भूमीवर स्वयं महाकाल अवतरले अशा उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराचे वर्णन आमच्या अनेक ग्रंथामध्ये पहावयास मिळते. या मंदिरात दरवर्षी दीड कोटींहून अधिक श्रद्धाळू श्री महाकालेश्वर बाबांच्या दर्शनासाठी येतात. मात्र एवढ्या गर्दीस सामावून घेण्यासाठी पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध नसल्याने भक्तगणांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात येताच भक्तगणांच्या भावनांचा आदर करत पंतप्रधान मोदीजींनी मंदिराचा कायापालट करण्याचा विडा उचलला. आणि महाकाल लोक निर्माण करून एक अलौकिक धाम निर्मिला.
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर
पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांच्या त्रिशुलावर स्थित काशी विश्वनाथ मंदिरात येणारे भक्त अरुंद रस्ते आणि त्यादरम्यान येणाऱ्या समस्यांनी त्रस्त होते. रस्ते परिसर आणि जवळपासचा भाग विलोभनीय बनवण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींनी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आणि हा भव्य प्रकल्प अवघ्या ३२ महिन्यांत तयार करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्यानगरी कित्येक शतकांच्या लढ्यानंतर पुन्हा एकदा तेजोमय होत आहे. सामाजिक, राजकीय, न्यायालयीन लढाया लढून आता राममंदिराचे कार्य प्रगतीपथावर आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामरायाचे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी भूमिपूजन केले. २.७ एकर जागा व्यापलेले हे प्रशस्त मंदिर लवकरच साकार होणार आहे. आणि भारतीय जनमानसाच्या आस्थेचे प्रतिक असणाऱ्या प्रभू श्रीरामांना त्यांचे उचित स्थान प्राप्त होणार आहे.
या माहितीपटाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला आपली खोलवर रुजलेली मुळे, संस्कृती आणि वारसा समजणार आहे. ही मालिका विद्यमान मोदी सरकारच्या मान्यतेनुसार सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला केंद्रस्थानी ठेऊन बनवण्यात आली आहे. भारताची समृद्ध परंपरा, आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना ही चित्रफीत समर्पित आहे.
प्रत्येक भारतीय व्यक्तीची मान अभिमानाने उंचावणारा माहितीपट
‘धरोहर भारत की – पुनरुत्थान की कहानी’ या माहितीपटातून नव्या भारताची झलक दाखवण्यात आली आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून भारत देश आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक वारशाचे आणि ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण आणि संवर्धन कशाप्रकारे करत आहे हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सभ्यता, भारताच्या तेजस्वी प्राचीन संस्कृतीच्या वैभवाचे पुनरुत्थान दाखवण्यात आले आहे. हा माहितीपट पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय मनाला नक्कीच अभिमान वाटेल.
माहितीपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल…
दोन भाग मिळून बनलेल्या या माहितीपटातून भारताचे विविधांगी सांस्कृतिक पैलू देशवासीयांसमोर उलगडण्यात आले आहेत. दुसरा भाग स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ समर्पित करण्यात आला आहे. या दोन्ही माहितीपटांमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
माहितीपटाचा पहिला भाग अवश्य पहा…
या माहितीपटामध्ये प्राचीन भारताच्या संस्कृतीतील प्रतीकांचे संरक्षण, महान सांस्कृतिक वारशाचे जतन आणि भव्य पुनर्निर्माण, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे जवान यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली अनेक स्मारके आपल्याला पहायला मिळणार आहेत. यासोबतच भारत सरकारच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन होत असतानाच त्यांना लाभत असलेली भव्यता विषद केली आहे. खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आपण YouTube वर या मालिकेचा पहिला भाग अवश्य पहा.