*पुणे-* हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर ठरलं आहे. कारण पु्ण्यात जे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला, ते सुनील तटकरेंना आणण्यासाठी मुंबईला निघाले होते, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला.
पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले होते. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकले होते. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर ते खाली कोसळले. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे.