

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने उसंत घेतली आहे. पण अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असते. मुंबईत अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे उकाडा वाढला आहे. ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पण आता मुंबईसह राज्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने उसंत घेतली आहे. पण अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असते. मुंबईत अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे उकाडा वाढला आहे. ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पण आता मुंबईसह राज्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मे महिन्यातच राज्यातील धरणे आता भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, नागरिकांनी पावसाचा जोर वाढल्यानंतर शक्य असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन आधीच हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. कारण आतापर्यंत महाराष्ट्रात 350 मिलमीटर पाऊस झालेला आहे आणि याच्यानंतर 7, 8 जूनला देखील अनेक भागांमध्ये बदलत पाऊस पडणार आहे. त्यानंतर 13 ते 17 जूनच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पावसाने राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.