मुंबई : नैऋत्य मौसमी पावसाने आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील २४ तासांतही राज्यात चांगला पाऊस होणार असून, काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने विदर्भाकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपर्यंत मौसमी वाऱ्यांनी निम्मा महाराष्ट्र व्यापला होता. मंगळवारी मान्सून अकोला, पुसद येथे पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली. त्यामुळे पुढील ३ दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो. त्यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये. घरातील विजेची उपकरणे बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.