पोलादपूर ( प्रतिनिधी)-:
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास गुरूनानक ढाब्यासमोरील वीर चहाची टपरी येथे एक मोटारसायकल आणि एक ऍक्टीव्हा स्कूटरच्या समोरासमोर टक्करीत चारजण जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस सुत्रांनी दिली आहे. पालर्ेतील स्कूटरस्वार अनिल नाना पालांडे हा उपचारादरम्यान मृत पावल्याची माहिती पोलीस सुत्रांनी उशिरा दिली.
पोलादपूर तालुक्यातील पार्टेकोंड येथील आशिष अशोक पार्टे (वय 27) याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एमएच 02 बीए 328) भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून लोहारे गावाच्या हद्दीतील गुरूनानक ढाब्यासमोरील वीर चहाची टपरी येथे आली असता बेदरकारपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दूर्लक्ष करून चालवित पोलादपूरकडून महाडच्या दिशेने ऍक्टीव्हा स्कुटर (क्रमांक एमएच 01 डीएम 5547) चालवित येणारे साक्षीदार अनिल नाना पालांडे (वय 52, पार्ले बौध्दवाडी) यांना जोरदार धडक दिली.
यावेळी आशिष अशोक पार्टे याने स्वत:सह फिर्यादी अंकुश राजाराम सकपाळ (35 पार्टेकोंड) व अनुग्रह अंकूश सकपाळ (09,पार्टेकोंड) आणि ऍक्टीव्हा स्कूटरचालक अनिल नाना पालांडे यांच्या लहानमोठया जखमांना कारणीभूत ठरून दोन्ही वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरला म्हणून आशिष अशोक पार्टे (वय 27) याच्या विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा र.नं. 37-2024 नुसार भा.दं.वि.कलम संहिता 279, 337, 338 व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपचारादरम्यान ऍक्टीव्हा स्कूटरचालक अनिल नाना पालांडे मयत झाल्याची माहिती पोलीसांनी उशिरा दिली.
पोलादपूर पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर ठाणे अंमलदार व्हि.व्हि.महाडीक यांनी गुन्हा दाखल केला असून तपासिक अंमलदार पोलीस हवालदार जागडे अधिक तपास करीत आहेत.