निवासी भागात तळीरामांचा हैदोस.!

Spread the love

▶️ धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानात आणि रस्त्याबाजूच्या बस/ट्रक पार्किंग आडून होत आहे दारूचा पार्ट्या…

▪️मुंबई :- आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती जोरात साजरी होत असताना त्यांचाच नावे असलेले डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानात रात्रीचा वेळी तळीराम/दारुड्यांचा पार्ट्या जोरात चालू आहेत. त्यामुळे या उद्यानात दारुच्या बाटल्या आणि चकणा यांची खाली पाकिटे यांचा खच पडलेला पाहण्यास मिळतो.

▪️या उद्यानाचा कुंपणाची जाळी तुटल्याने त्यातून हे दारुडे आत शिरत आहेत. शिवाय याच उद्यानाची दुर्दशा झाली असून झाडी झुडपे वाढली आहेत तर आतील खेळणी तुटली फुटली आणि चोरीस गेली आहेत.

▪️धर्मवीर आनंद दिघे बालउद्यान 2002 साली तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांचा निधीतून आणि नंतर 2017 मध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा निधीतून पुन्हा सुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती केडीएमसी कडे असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

▪️याच उद्यानात केडीएमसीने उद्यान सकाळी उघडण्यासाठी व सायंकाळी सात वाजता बंद करण्यासाठी वॉचमन नेमणूक केली आहे. तेथे त्यासाठी वॉचमन केबिन पण तयार केली आहे. परंतु सदर वॉचमन उद्यान उघडण्या आणि बंद करण्यापुरता येत असतो.

👉🏻 धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी करायची आणि त्यांचा नावे असलेल्या उद्यानाचा दुर्दशेकडे ढुंकून पाहायचे नाही यामुळे येथील नागरिकांत मोठा असंतोष व चीड निर्माण झाली आहे. हीच काहीशी परिस्थिती मिलापनगर मधील वंदेमातरम् उद्यान बाहेर रस्त्यावर असलेल्या कट्ट्यावर पण तळीराम/दारुडे खुलेआम दारू पिऊन त्या बाटल्या व चकणा व खाली प्लास्टिक पाकिटे उद्यानात भिरकावून उद्यान विद्रूप करीत आहेत.

▪️धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे असे पत्र शिवसेना विभाग प्रमुख अशोक पगारे आणि माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी आमदार राजु पाटील आणि केडीएमसी यांना देण्यात आले आहे.

👉🏻 याशिवाय निवासी भागात पार्किंगला चांगली जागा मिळत असल्याने अनेक खाजगी बस, ट्रक चालक/क्लिनर हे रात्रीच्यावेळी आपल्या गाड्या रस्त्यांचा कडेला उभ्या करीत असतात. सदर बसचा आडून काही तळीराम/दारुडे यांचा पार्ट्या होत असल्याने निवासी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांचा कडेला असलेल्या गटारीचा बाजूला लागून बस, ट्रक पार्किंग करून उभे असतात त्या छोट्या गॅप मध्ये बसून काहीजण दारू ढोसून तर्र होऊन नशेत असतात. हे सद्या मोठ्या प्रमाणात निवासी भागात चालू असल्याचे दिसत आहे. सकाळीच फिरायला येणाऱ्या नागरिकांना सदर उद्यानातील आणि रस्त्यांचा गटारीचा बाजूला रोजच दारूचा बाटल्यांचे आणि सोबत उरलेला काही चकणा यांचे दर्शन पाहण्यास मिळत आहे. हे तळीराम/दारुडे कोण आहेत, कोठून येतात ? याचा तपास करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यात कधी कधी वाद/भांडणे झाल्याचे दिसून येते. त्यामुळे काहीशा गुन्हेगारीचा घटना घडण्यास वाव मिळू शकतो आणि गुन्हेगारीचा प्रकारात वाढ होऊ शकते.

▪️एमआयडीसी निवासी भागात मोठ्या शाळेंच्या/रुग्णालयाच्या हाकेचा अंतरावर बिअर शॉपी, बार झाले आहेत. काहींना बार मध्ये दारू पिणे परवडत नाही. त्यापेक्षा बार,दुकानातून क्वार्टर/खंबा आणून चने, शेंगदाणे चकणा आणून उद्यानात किंवा निवांत रस्त्यांचा बस, ट्रक मागे आडोशाला बसून दारू ढोसने हे परवडणारे व स्वस्तात होत असल्याने अशा मार्गाचा वापर हे तळीराम, दारुडे करीत असावेत. काही तर बिंदासपणे याच बिअरबार/शॉपी बाजूला कट्यावर बसून दारू ढोसत असतात.

▶️ सदर प्रकार गंभीर असून वेळीच केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाने दखल घेऊन त्यांचावर कडक कारवाई केली पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page