काल आणि आज सकाळी नरमाईचे धोरण स्वीकारणाऱ्या सोन्याने अचानक उसळी घेतली. सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना या नवीन दराने धक्का बसला. सोने जवळपास 67000 रुपयांच्या घरात पोहचले. कारण तरी काय..
सोन्याने तोडला रेकॉर्ड; भाव 67,000 रुपयांच्या जवळपास सोने पळाले सूसाट…
बुधवारी आणि आज सकाळी नरमाईची भूमिका घेणाऱ्या सोन्याच्या किंमतींनी अचानक यूटर्न घेतला. गुरुवारी सोन्याच्या किंमतींनी नवीन शिखर गाठले. जागतिक बाजारात सोन्याची किंमत पहिल्यांदा 2200 डॉलर प्रति औसवर पोहचली. त्याचा लागलीच परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. आज सराफा बाजारात अनेक ठिकाणी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,000 रुपयांच्या घरात पोहचली. सोन्याने चमकदार कामगिरी केली. सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना नव्या दराने धक्का बसला.
वायदे बाजारात सोने सूसाट..
गुरुवारी सोन्याच्या किंमतीत अचानक उसळी आली. वायदे बाजारात (MCX) सोन्याची किंमत 66,943 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर पोहचली. वायदे बाजारा सुरु होताच काही मिनिटात सोन्याने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी बजावली. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) बुधवारी सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 65,689 रुपये होते. तर आज हा भाव 66,968 रुपयांच्या घरात पोहचला. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जागतिक बाजारात सोन्याचा भाव 2,203.35 डॉलर प्रति औसच्या जवळपास आहे.
अचानक तेजीचे कारण तरी काय…
सोन्याच्या किंमतीत अचानक तेजीमागे अमेरिकेतील घडामोडींचा समावेश आहे. केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची बुधवारी बैठक झाली. यामध्ये बँकेने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. व्याज दर 5.25 ते 5.50 टक्के स्थिर होता. तसेच बँकेने तिसऱ्यांदा व्याजदरात लवकरच कपातीचे संकेत दिले. त्याचा लागलीची परिणाम दिसून आला. सोन्याचा भाव वधारला. पण या सर्वांमध्ये चांदीला तेजीवर स्वार होता आले नाही. एकीकडे सोने रेकॉर्ड करत असताना चांदीने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. MCX वर चांदी 75,915 रुपये प्रति किलोग्राम किंमतींवर उघडली. पण या घडामोडी घडत असताना ती 75,775 रुपयांपर्यंत खाली घसरली. जागतिक बाजारात चांदी 25.63 डॉलर प्रति औसच्या जवळपास ट्रेड करत होती.
Sensex ची 750 अंकांची घौडदौड…
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका दिला. पण नवीन घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून आला. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत तुफान तेजी आली. दुपारपर्यंत 30 शेअर्सचा सेन्सेक्स 751 अंकांनी उसळून 72,852 अंकापर्यंत वधारला. तर एनएसई निफ्टीत 235 अंकांची तेजी दिसून आली. तेजीसह निफ्टी 22,074 अंकावर व्यापार करत होता.