रत्नागिरी : महावितरण कंपनीला वीज विकणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील जिल्ह्यातील पहिला सौर प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर वेगाने कार्यवाही सुरू आहे. 7 कोटीचा हा प्रकल्प असून मार्च महिन्यात तो पूर्णत्वास जाऊन वीजनिर्मिती सुरू होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त केली आहे. एक मेगावॅटचा हा प्रकल्प असून विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून ४० टक्के वीज बिलावरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमधील राखीव निधीतून ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प गोळप येथे होणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध झाली आहे. कंपाऊंड टाकले आहे, पहिल्या टप्प्यातील पॅनल आले आहेत. या प्रकल्पांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष पाठबळ मिळाल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्याकडे आहे. मार्चअखेर हा प्रकल्प सुरू होऊन त्यातून वीज निर्मिती होणार आहे.
मार्चअखेर हा प्रकल्प सुरू होणार आहे. यातून १ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. ही वीज महावितरण कंपनीला विकूण साधारण वर्षाला ७० लाख रुपये जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) महिन्याचे वीजबिल 60 लाख येते. वर्षाचे वीजबिल सव्वासात कोटीवर जाते. अनेकवेळा वीजबिलांसाठी निधी न मिळाल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यास वीज विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून ग्रामपंचायतीची बील भागवणे शक्य होणार आहे.