श्रावणधारा कार्यक्रमात मुलींनी लुटला पारंपरिक खेळांचा आनंद !…

Spread the love

मंगळागौरीतील विविध खेळ,झिम्मा – फुगड्यांनी आली बहार!…

शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना संस्कृती रक्षणाचे शिक्षण आणि माहिती देणं सध्याच्या काळात खूप गरजेचे बनले आहे. अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञानातही विद्यार्थी चौकस बनावे यासाठी शाळांकडून विशेष प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरने आज आगळावेगळा श्रावण शनिवार साजरा करुन मुलांना श्रावणातील प्रथा परंपरांनी अवगत केले. झिम्मा, फुगड्या, टीपऱ्या, मंगळागौर यासारख्या विविध प्राचीन आणि पारंपारिक खेळांचे प्रशालेतील मुलींनी उत्तम पध्दतीने सादरीकरण करत उपस्थित सर्वांची वाहवा आणि शाब्बासकी मिळवली.

व्यापारी पैसा फंड संस्था संचलीत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर नेहमीच विविध स्तरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवत असते. वक्तृत्व, क्रिडा स्तरावर नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या विद्यालयाने आता सांस्कृतिक क्षेत्रातही वेगळी वाट चालण्याच्या हेतूने नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून संस्था सचिव धनंजय शेट्ये, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संकल्पनेतून आज प्रशालेत ‘ श्रावणधारा ‘ या श्रावण महिन्याचे सांस्कृतिक महत्व पटवून देणाऱ्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांनी श्रावण महिन्यातील स्त्रीयांच्या विविध खेळांचा उद्देश आणि या खेळांचे महत्व विषद केले. संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी बदलत्या काळात या प्रथा परंपरा बंद पडत असल्याने शाळेतील मुलींना याची बालपणीच ओळख व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

प्रशालेतील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनीनी श्रावणधारा कार्यक्रमात झिम्मा, फुगडी, टीपरी नृत्य, बसफुगडी, मंगळागौरीतील अन्य खेळ सादर करुन स्वतःमधील कलांचे उत्तम प्रदर्शन केले. मुलींनी सादर केलेल्या श्रावणातील खेळांतून संस्कृतीचे उत्तम दर्शन तर झालेच शिवाय या परंपरा पुढे चालविण्याचा वसाही मुलींना घेता आला. पाचवी ते बारावीच्या वर्गातील मुलींनी श्रावणधारा कार्यक्रमात भाग घेऊन स्वतः मधील कलाविष्कार सादर केला. अशा कार्यक्रमांचे प्रशालेत दरवर्षी आयोजन करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील महिला शिक्षिकांसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. श्रावणधारा कार्यक्रमात एकूण २० बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी मंगळागौर खेळाच्या महत्त्वाची विविध उदाहरणे देत केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page