रत्नागिरी, दि. 12 (जिमाका) – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सर्व कार्यान्वयीन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत माहे जानेवारी अखेर खर्चाचा आज आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये यांनी यंत्रणानिहाय वाचन करुन माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, नियोजनचे प्रधान सचिव सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाबाबत दररोज माहिती घेत असतात. सर्व यंत्रणांनी हा निधी वेळेत खर्च करावयाचा आहे. ज्या यंत्रणांची अद्यापही प्रशासकीय मान्यता बाकी आहेत, त्या पूर्ण करुन घ्याव्यात. कोणतेही काम प्रलंबित ठेवू नये. विशेषत: जिल्हा परिषदेच्या विविध योजनांबाबत संबंधित विभाग प्रमुखांनी कटाक्षाने कार्यवाही करावी.