राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरू…

राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा त्याचे अस्तित्व आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विविध अंगी लिखाण या निमित्ताने सर्वत्र होत आहे त्या संदर्भातील हा विशेष लेख.
मराठी भाषा ही सर्वसमावेशक भाषा आहे आणि या भाषेने इतर भाषेतील शब्दांनाही सामावून घेतले असल्याने मराठी भाषा ही सातत्याने समृध्द होणारी एक श्रीमंत भाषा झाली आहे असेही आपणास म्हणता येईल. जागतिक स्तरावर देखील मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याला अधिक बळकटी मिळत आहे आणि त्यामुळे तो केवळ भाषा विस्तार न राहता महाराष्ट्रीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होण्याचे साधन असे स्वरुप आले आहे.
मराठी भाषा ही अभिजात आहे यासाठीचे प्रयत्न सुरु आहे. भाषा अभिजात आहे किंवा नाही हे त्याच्या आरंभाच्या आधारे निश्चित केले जाते. मराठी भाषेचा इतिहास किती मोठा आहे याचा शोध घेणे व त्यावर लिखाण हा प्रवास सातत्याने सुरु आहे. माझ्या मते संशोधक ते कार्य उत्तमपणे करीत आहे. एक मराठी भाषक म्हणून त्याचा प्रसार होण्यासाठी मराठी भाषेचे भविष्य काय आणि कसे असावे यावर अधिक लक्ष आपण द्यायला हवे.
मराठी भाषा आणि त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे मात्र मराठीत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे परिणामी मराठी शाळा बंद होताना दिसतात याकडे अधिक लक्ष असले पाहिजे. आज जी पिढी पालकाच्या भूमिकेत आहे त्या सर्वांचे शिक्षण अर्थातच मराठी माध्यमातून झाले आहे तथापि पाल्यांना मात्र इंग्रजी माध्यमात शिकवायचे अशी मानसिकता या पिढीने ठेवल्याने किंचित परिणाम आपणास दिसतो आहे.
व्यक्त होण्यास सर्वात सोपी भाषा म्हणजेच आपली मातृभाषा अर्थात मराठी भाषा या अर्थाने आपण बघतो. नाना पाटेकरांनी याबाबत केलेले विधान प्रसिध्दच आहे. ‘मला स्वप्नच मराठी भाषेत पडतात’ असे ते विधान अगदी मनाची भाषा म्हणून आपण मराठी भाषा बोलतो त्यामुळे भाषेच्या भविष्याबाबतही आपण तितक्याच आत्मीयतेने बघितले तर भाषेचा भविष्यकाळ चांगलाच असेल असे म्हणता येईल.
मराठी भाषा टिकण्याची शक्यता आणि लिपी टिकण्याची शक्यता यात मुळात फरक आहे. मराठी लिहिण्यासाठी आपण देवनागरी लिपीचा वापर करतो. संस्कृत पासून विकसित भाषा म्हणून जशी मराठी मान्य झाली तशीच मान्यता हिंदी भाषेला देखील आहे. त्या अर्थाने देवनागरी लिपीचा वापर हिंदी भाषेत देखील होतो आणि आता हिंदी भाषेचा प्रसार अधिक प्रमाणात वाढला आहे. जगातली तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदी आता ओळखली जाते. युरोपीय देशात आता रस्त्यांवरील दिशादर्शक भाषा म्हणून हिंदीतही फलक दिसत आहेत त्या अर्थाने देवनागरी लिपी सर्वत्र पोहोचली आहे याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही.
आज तंत्राच्या प्रगतीमुळे एक प्रकारे मराठी भाषेच्या प्रसारास गतीच मिळाली आहे. आज भाषांतर करण्याचे काम संगणकावर झटपट होते त्यामुळे लिपी न येणाऱ्यालाही मराठी भाषा सोपी झालीच या पार्श्वभूमीवर मराठीचे भविष्य निश्चितपणाने चांगले राहणार याची खात्री आहे.