गणपतीपुळे समुद्रात सोलापूरातील चार तरूण बुडाले; एकाचा मृत्यू; तिघांना वाचवण्यात यश…

Spread the love

रत्नागिरी- रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे सोलापूरातून पर्यटनासाठी आलेले चार तरुण समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य तिघांना वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. ही दुर्देवी घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अजित धनाजी वाडेकर (वय-२५, रा. सोलापूर) असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

अजय बबन शिंदे, आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रय माने, अशी वाचण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे चौघे मित्र सोलापूर येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अजित वाडेकर हा पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बुडताना पाहून इतर मित्रही खोल पाण्यात उतरले. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले. चार तरुणांना बुडताना पाहून इतर पर्यटकांनी आरडाओरड सुरू केली. तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या. अथक प्रयत्नानंतर चारही तरुणांना पाण्याबाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं. मात्र, यातील अजितच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page