भारतीय हॉकी संघाचा सामना उद्या (5 ऑगस्ट) जर्मनीबरोबर होणार आहे. यामध्ये भारतीय टीम जर्मनीला पराभूत करून इतिहास रचेल, असा विश्वास माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला आहे. जाणून घ्या त्यांचं मत…
*मुंबई :* पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळाच्या उपांत्यपूर्वी सामन्यात भारतानं ब्रिटनला हरवून उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. “भारत आता सुवर्ण पदकाजवळ पोहोचला आहे. संपूर्ण ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाकडून चांगली कामगिरी होत आहे. हे पाहता भारत नक्कीच इतिहासाची पुनरावृत्ती करेल,” असा ठाम आत्मविश्वास चार ओलंपिक आणि चार विश्वचषक खेळलेल्या ऑल टाइम महान खेळाडू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला आहे. ते ‘ईटीव्ही भारत’शी बोलत होते.
*जर्मनी आणि भारत यांच्या खेळात फारसा फरक नाही-*
याप्रसंगी बोलताना धनराज पिल्ले म्हणाले की, “उद्या भारताची महत्त्वाची लढत ही जर्मनीबरोबर होत आहे. यापूर्वी या ऑलम्पिकसाठी सुवर्ण पदकाच्या मुख्य दावेदार असलेल्या अर्जेंटिना आणि बेल्जियम या टीम उपांत्यपूर्वी सामन्यामध्येच बाहेर झाल्या आहेत. या कारणानं भारताच्या आशा आता अधिक पल्लवित झाल्या आहेत. सध्या भारतीय हॉकी टीम फॉर्ममध्ये खेळत आहे. ते पाहता सुरुवातीपासून प्रत्येक सामन्यामध्ये भारतीय टीम काही शिकत गेली आहे. चुकांमध्ये सुधारणा करत गेली. वास्तविक जागतिक क्रमवारीमध्ये जर्मनी आणि भारताचे रेकॉर्ड बघितले तर सध्याचा विश्वविजेता तसेच चार वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता ठरलेला जर्मनी आणि भारत यांच्यात फारसा फरक नाही. जागतिक क्रमवारीमध्ये सध्या जर्मनी चौथ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारतीय गोलकीपर श्रीजेश हा एखाद्या भिंतीसारखा गोल्ड पोस्टसमोर उभा ठाकत आहे. सध्या हरमनप्रीतसुद्धा चांगल्या लयीमध्ये खेळत आहे. ते पाहता जर्मनीविरोधात नक्कीच भारत विजयी होईल.”
*डोन्ट बी ओवर कॉन्फिडंट –*
“उद्याच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. परंतु हा आत्मविश्वास अति आत्मविश्वास असता कामा नये, असा धनराज पिल्लेंनी संघाला सल्ला दिला. पुढे पिल्ले म्हणाले, “तुम्ही तुमच्या सामन्याची मजा घ्या. १९८० मॉस्को ऑलम्पिकमध्ये भारतानं शेवटचं सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर ४० वर्षानं २०२०मध्ये टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतानं कांस्यपदक जिंकलं. सुवर्ण पदकासाठी आपणाला चार दशक वाट पाहावी लागली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. स्वतःवर कुठल्याही पद्धतीचं दडपण आणू नका. परंतु आपण कितीही मेहनतीनं खेळलो, तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये नशीबसुद्धा आपल्या बाजूनं असणं गरजेचं आहे,” असंही धनराज पिल्ले यांनी नमूद केलं.
*श्रीजेश सोबत अद्भुत शक्ती :*
ब्रिटनसोबत झालेल्या सामन्यादरम्यान भारताचा सर्वोत्कृष्ट डिफेंडर अमित रोहिदास याला ‘रेड कार्ड’ दाखवल्यानं त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. याकरिता जर्मनीसोबत होणाऱ्या उपांत्य सामन्यात तो सामना खेळू शकणार नाही. भारताला १० खेळाडूंसोबत खेळावे लागणार आहे. या विषयावर बोलताना धनराज पिल्ले म्हणाले की, “अमित रोहिदास हा सर्वोत्कृष्ट डिफेंडर आहे. तो सामन्याबाहेर राहिल्यानं त्याचा नक्कीच परिणाम हा खेळावर होणार आहे. कारण त्याची कमतरता या मॅचमध्ये नक्कीच जाणवणार आहे. यात कुठलंही दुमत नाही. मनप्रीत सिंग सतत ६० मिनिटं खेळणार की, त्यामध्ये थोडासा ब्रेक देणार याबाबत भारताचे दोन्ही कोच रणनीती आखतील. कारण पेनल्टी शूटआउट दरम्यान अमित रोहिदासची कमी भरून काढण्यासाठी मनप्रीत सिंगवर मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु गोलकीपर नाईक श्रीजेश सध्या फॉर्म दिसत आहे. ते पाहता एक अद्भुत शक्ती त्याच्याकडे दिसून येत आहे.”
*अमित रोहिदास नव्या दमानं येईल :*
“ब्रिटनबरोबर झालेल्या सामन्यात ब्रिटननं भारतीय गोलवर २८ वेळा अटॅक केला. त्यासोबत १० पेनल्टी कॉर्नर घेतले. परंतु त्यात त्यांना एकदाच यश प्राप्त झालं. याचं संपूर्ण श्रेय ३६ वर्षीय गोलकीपर नाईक श्रीजेशला जातं. अशा परिस्थितीमध्ये हे दहा खेळाडू उद्या सर्वस्व पणाला लावून करोडो भारतीयांच्या आशा अपेक्षांची पूर्तता करून जर्मनीसोबत जिंकतील. अखेरच्या फायनल सामन्यामध्ये अमित रोहिदास पुन्हा नव्या दमानं पुनरागमन करेल,” असा ठाम आत्मविश्वास धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला आहे.