संभाजीनगर ‘लोकसभे’साठी भाजपचे धक्कातंत्र:शहरभर लागले JR चे बॅनर; सोबतीला नीलम गोऱ्हेंचा दावा, खरंच नवा चेहरा मिळणार का?….

Spread the love

छत्रपती संभाजीनगर- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर भाजपकडून तयारी सुरू आहे. असे असले तरी या मतदार संघातून अनपेक्षित उमेदवार असू शकतो, असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला, त्यानंतर शहरभरात We Support JR अशा आशयाचे बॅनर्स लागलेत… ह्यावरून हा नवा उमेदवार कोण अशी चर्चा रंगू लागली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष डॉ. जीवन राजपूत यांनी खास संवाद साधला. तेव्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले. त्यामुळे आगामी काळात होणार काय, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

गेली अनेक दिवस छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाटेला येणार यावरून अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. मात्र, असे असले तरी भाजपकडून केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार भागवत कराड यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या तथा उपसभापती विधान परिषद नीलम गोरे यांनी मतदारसंघात अन अपेक्षित चेहरा दिला जाऊ शकतो असे विधान केले त्यातच शहरभर वुई सपोर्ट जेआर असे बॅनर लावण्यात आले. आता हे जीआर म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न मतदारांना पडला होता, या संदर्भात दिव्य मराठी डिजिटलशी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष तथा डॉक्टर जीवन राजपूत यांनी संवाद साधला. तेव्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीचा अनपेक्षित चेहरा म्हणून जीवन राजपूत तर पुढे येणार नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेले जीवन राजपूत यांनी मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधत आपली तयारी सुरू केली आहे. भाजपकडून आपकी बार 400 पार असा नारा देण्यात येत आहे, यासाठी मराठवाड्यातील संभाजीनगर लोकसभा भाजपला महत्त्वाचे असणार आहे.

पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जीवन राजपूत म्हणाले की, गेली अनेक वर्षे मतदारसंघात विकास झाला नाही. यासाठी कुठे तर आपण मतदार म्हणून कमी पडलो. कारण या निवडणुका धार्मिक मुद्द्यावर लढल्या गेल्या. उच्चशिक्षित तरुणांनी राजकारणात येत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला हवी. गेली 25 वर्ष विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विकासासाठी छत्रपती संभाजीनगरला उच्चशिक्षित उमेदवार असावा म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमके कोण आहेत JR?…

जीवन राजपूत हे मूळचे वैजापूर तालुक्यातील आहेत. वैद्यकीय शिक्षणासह त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. 1999 पासून ते बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जोडले गेलेले आहेत. 2016 पासून विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या जीवन राजपूत यांनी रुग्णालय कंपन्या स्थापन करत रोजगार निर्मितीसह आरोग्य सेवेवरती भर दिला आहे. कोविड काळात मोफत उपचार यामुळे ते चर्चेत आले होते, तर जिल्ह्यातील अनेक गावामध्ये आरोग्य शिबिरांच्या मार्फत त्यांनी जनसंपर्क केला आहे. आता नेमके भाजप शिवसेना ठाकरे गट कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून मतदारसंघावर दावा…

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवणार असे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले होते. मराठा आंदोलनामुळे अनेक राजकीय गणित बदलली आहेत. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र आहे. मागील काही वर्षांमध्ये इतर समाजाच्या नेत्यांना होणारा विरोध आणि प्रत्येक मतदार क्षेत्रात जातीय समीकरण पाहता अनेक पक्ष मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काही पक्षांकडे तितका प्रबळ मराठा चेहरा नसला तरी इतर पक्षातून किंवा सामाजिक क्षेत्रातून काम करणाऱ्या जनमानसात ओळख असणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चाचपणी होत असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत इच्छुक?…

भाजपकडून लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड मंत्री, अतुल सावे यांच्यासह आमदार प्रशांत बंब यांचे नाव चर्चेत आले, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, गफ्फार कादरी, कदीर मौलाना हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात 1999 ते 2019 पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळायचा. मात्र, 2019 च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभेसाठी चौरंगी लढत झाली यात शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे काँग्रेसकडून सुभाष झांबड एमआयएमकडून इम्तियाज जलील तर अपक्ष उमेदवार तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेल्या पावणेतीन लाख मतांमुळे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे या मतदारसंघाचे खासदार झाले.

जिल्ह्यात अनेक समस्या…

सात दिवसाला येणार पाणी, दुष्काळ, वाढती गुन्हेगारी या सगळ्या समस्या असताना औरंगाबादकरांनी 1999 ते 2014 या काळात चंद्रकांत खैरे यांना खासदार म्हणून निवडून दिले. पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरातील राजकीय परिस्थिती बरीच बदलली आहे. यंदा मराठा आणि ओबीसी हे समीकरण निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. यामुळेच की काय ग्रामीण भागातील असलेल्या डॉक्टर जीवन राजपूत यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

मतदारसंघात जातीय समीकरण महत्त्वाचे…

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. ज्यामध्ये मध्य, पूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड हे विधानसभा मतदार संघ येतात. या मतदारसंघात मराठा मुस्लीम आणि ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. ‘एमआयएम’ने युती करत दलित ओबीसी मुस्लिम मतदार स्वतःकडे आकर्षित केल्याने एक घटका मतदान मिळाल्याने जलील 2019 ची निवडणूक जिंकले होते… यानंतर आता कोण 2024 च्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार आणि कोण या मतदारसंघाचे नेतृत्व करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page