‘मागच्या दोन दिवसांपासून त्यांना…’, खडसेंना एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला आणण्याआधी मुलीने दिली प्रकृतीची अपडेट

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

जळगाव /जनशक्तीचा दबाव /5 नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगरच्या खासगी रुग्णालयात गेले होते, या तपासणीच्या दरम्यान त्यांना काही बदल आढळून आले. यासाठी पुढच्या तपासण्या करण्यासाठी ते तातडीने जळगावला रवाना झाले. जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.
खडसेंवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एअर ऍम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क साधला होता. खडसेंना पुढच्या उपचारासाठी तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. खडसेंच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली.

खडसेंच्या प्रकृतीची मुलीनं दिली अपडेट

‘मागच्या दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे चेकअपसाठी त्यांना जळगावला आणलं आहे. त्यांच्या तब्येतीबाबत कोणतीही रिस्क घ्यायची नाही, म्हणून एअर ऍम्ब्युलन्सने आम्ही त्यांना मुंबईला शिफ्ट करत आहे. साडेसात वाजता आम्ही त्यांना मुंबईला नेणार आहोत. त्यांची तब्येत स्थिर आहे. फार काळजी करण्याची गरज नाही. प्रिकॉशनसाठी आम्ही त्यांना मुंबईला नेतोय,’ असं एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे.

‘त्यांची तब्येतीची हिस्ट्री बघता कॉम्प्लिकेशन्स बघता आम्हाला इथे उपचार घेणं रिस्की आहे, म्हणून आम्ही त्यांना मुंबईला नेत आहे. तिथे त्यांना व्यवस्थित उपचार मिळतील. त्यांची प्रकृती स्थिर आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणीही काळजी करू नका. सगळ्यांनी शांतता ठेवा,’ असं आवाहनही रोहिणी खडसे यांनी केलं आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसे यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, तिथल्या डॉक्टरांशी बोलणं झालं आहे, असंही रोहिणी खडसेंनी सांगितलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page