भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सर्वपक्षीय संबंधामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. याचा प्रत्यय राणे यांच्या राजापूर दौऱ्यावेळी आला. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गणपतराव कदम यांनी चक्क राणेंचं कौतुक केलं. आज मी जो काही आहे, तो केवळ दादांमुळे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विकासासाठी नारायण राणे यांच्याबरोबर राहणार आहे. त्यांच्यावर असलेल्या माझ्या श्रद्धेमुळेच मी आज माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट असतानाही इथे आलो आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
माझ्यासाठी राणे साहेबांनी बाळासाहेबांना त्यांचा नियम मोडायला लावला व मला राजापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. दादा मुख्यमंत्री असताना मी नेहमीप्रमाणे वर्षा बंगल्यावर गेलो होतो. मला त्यांनी सांगितलं अरे तू इथे काय करतो आहेस, यादी जाहीर झाली, कामाला लाग, तेव्हा मी त्यांना म्हटलं माझं नाव यादीत नाही, यादी पहा, त्यांनी यादी पाहिली, माझं नाव नव्हतं, पण क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला गाडीत बसवलं आणि थेट मातोश्रीवर बाळासाहेबांकडे घेऊन गेले. तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले नारायण आपली यादी जाहीर झाली, आता आपण कोणी आले तरी बदल करू शकत नाही, तुला माहिती आहे. तेव्हा राणे साहेबांनी सांगितलं, की साहेब तुम्हाला या वेळेला नियम मोडून हा बदल करावाच लागेल. गणपतला उमेदवारी द्यावी लागेल आणि मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली” अशा शब्दात गणपतराव कदम यांनी हा मोठा किस्सा राणे यांच्या भेटी वेळी सांगितला आहे.
इतकेच नाही तर मी वेगळ्या पक्षात आहे. ठाकरे गटात आहे. पण तुम्हाला मी मदत करणार. मी दादांजवळ खाजगीत काय ते बोलीन. केवळ तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणून मी येथे आलो. माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राजकारणात घालवलेला काळ आपल्या कुटुंबाची सगळी परिस्थिती सांगताना माजी आमदार गणपत कदम भावूक झाले. रत्नागिरीच्या विकासासाठी राणे साहेबांच्या पाठीशी राहण्याचे गणपत कदम यांनी आवाहन केले.
मी आज जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांबद्दलचे प्रेम कधीच कमी होणार नाही, माझी त्यांच्यावर श्रद्धा कायम आहे. आज मी जो काही आहे, तो दादांमुळे. नगरसेवक झालो पण त्यानंतर जी सगळी पदे मिळाली, आमदारकी मिळाली ती दादांमुळेच मिळाली, असे कृतज्ञतापूर्वक कदम यांनी नमूद केले. शिवसेनेत एकदा जाहीर झालेले तिकीट बदलून आणणे शक्य नसते, पण ती किमया दादांनी केली आणि मी आमदार झालो ही मोठी आठवण त्यांनी सांगितली.