
चिपळूण :- मुसळधार पावसामुळे आज बुधवारी येथे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. बाजारपेठमध्ये पाणी शिरल्याने नगर परिषदेने सलग तीन वेळा भोंगा वाजवून व शहरात गाडी फिरवून सतर्कतेचा इशारा दिला.
पावसामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. बुधवारी पहाटेपासून येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर देखील पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली. बाजारपुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता बंद पडला आहे.
या परिस्थितीमुळे येथील व्यापारी वर्ग धास्तावला असून काहींनी दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नगर परिषदेने सकाळी ९.३० वाजता सलग तीन वेळा भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिल्याने बाजारपेठ परिसरातील नागरिकांनीही घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासात कोलकेवाडी आणि पोफळी २२० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच चिपळूण परिसरात १४३.८८ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
पहा विडिओ सविस्तर
