▪️ अनकेदा मंदिरातील मूर्ती चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरीला जाते. अशीच काहीशी घटना औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील पाचपीर गावच्या महादेव मंदिरात घडली आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी आलेल्या दोन्ही चोरांनी आधी मंदिरातील देवाला वाकून नमस्कार केला, त्यानंतर फुल वाहुन दानपेटीतील पैसे लंपास केले. विशेष म्हणजे ही सर्व घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
▪️ याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील पाचपीर गावात महादेवाचे मंदिर आहे. गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात नेहमी भाविक दर्शनासाठी येत असतात. अनकेदा बाहेरील व्यक्तीदेखील दर्शन करून जातात. दरम्यान २२ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून २४ मिनटांनी दोन तरुणांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. आधी देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरून नेले. अवघ्या १ मिनटात त्यांनी दानपेटीतील पैसे काढून घेऊन त्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
▪️ दोन्ही तरुण मंदिरात प्रवेश करताच, आधी मंदिरात असलेल्या शिवलिंगला वाकून नमस्कार करतात. त्यानंतर देवाचे दर्शन घेतात. एवढंच नाहीतर शिवलिंगासमोर ठेवलेले फुल देवाला वाहतात. त्यानंतर पुन्हा एकदा देवाचे दर्शन घेऊन मंदिरातील दानपेटीकडे जातात. दानपेटीला कुलूप नसल्याने ती उघडून त्यातील पैश्यांची पाहणी करून, पैसे काढून घेतात. दोन्ही चोरटे दानपेटीमधील पैसे काढून आपल्या खिशात घालतात. एक नाही तर दोनतीन वेळ दानपेटीतील पैसे काढताना चोर दिसत आहे. संपूर्ण पैसे काढल्यावर दोन्ही तेथून निघून जातात.
▪️ मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या दोनपैकी एका चोराने आपली ओळख पटू नयेत म्हणून, डोक्यात टोपी घालून चेहरा देखील लपवला होता. मात्र दुसऱ्या चोराचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपर्ण घटना कैद झाली आहे. दोन्ही चोर मंदिरात आल्यापासून चोरी करून बाहेर पडेपर्यंत सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही चोरांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.