चेन्नई- भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचे आज गुरुवारी चेन्नई येथे निधन झाले. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथन हे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक होते.
स्वामीनाथन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. वयोमानापरत्वे जडलेल्या आजारांमुळे आज सकाळी ११.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. चेन्नईतील तेनमपेट येथील त्यांच्या निवासस्थानी एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले. एमएस स्वामीनाथन यांच्या पश्चात MSSRF च्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन अशा तीन कन्या आहेत.
एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन होते. ते ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे काका एम. के. नारायणस्वामी यांनी घेतली. लहानपणीच ते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले. बंगालमधील भूकबळीच्या घटनांमुळं ते खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हाच त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं मनाशी ठरवलं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण केलं.
१९६० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत संशोधक म्हणून कार्यरत असताना त्यांना डॉ. बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या मेक्सिकन ड्वार्फ या नवीन प्रजातीविषयी माहिती मिळाली. त्यांनी डॉ. बोरलॉग यांना भारतात आंमत्रित केलं. त्यांच्यासोबत काम करता-करता स्वामीनाथन यांनी भारतात उच्च प्रतीच्या गव्हाचं उत्पादन घेतलं. तसंच, कोणती खतं वापरून अधिक उत्पादन घेता येईल याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि गव्हाचं उत्पादन चार हंगामात १.२ कोटी टनावरून २.३ कोटी टन इतकं झालं.