
छत्रपती संभाजीनगर- अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाने मराठवाड्याचा शेतकरी होरपळला आहे. मात्र अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला अन् दीड एकर शेतात ८०० तैवान जातीच्या पेरूची झाडे लावली. त्यासाठी वर्षभर एकूण एक लाख रुपये खर्च केले. आता वर्षाला चार लाख रुपये उत्पन्न मिळाले. आणखी दोन लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा या शेतकऱ्याला आहे.
मराठवाडा म्हटलं तर पाचवीला पुजलेला दुष्काळ. याच दुष्काळात होरपळणारा मराठवाड्यातील शेतकरी ही परिस्थिती वर्षानुवर्ष चालत आहे. मात्र यांचं परिस्थितीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील राजेंद्र हाके या शेतकऱ्याने मात तर केलीच पण कमालही करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आडगाव बुद्रुक हे राजेंद्र हाके यांचं गाव आहे. या गावात बहुतांशी शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. राजेंद्र हाके यांना १० एकर शेती आहे. त्यांना एकुलती एक मुलगी असून पत्नी आणि राजेंद्र हाके हे शेती करतात.
पारंपारिक शेतीसोबत त्यांनी मोसंबीची बाग शेतात लावली होती. मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे ती बाग त्यांना नष्ट करावी लागली. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा मोठा त्रास हा राजेंद्र हाके यांच्या कुटुंबाला झाला. दरवर्षी निसर्गाची अनियमिततामुळे कंटाळलेल्या हाके कुटुंबाने काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी आजूबाजूला माहिती घेतली. त्याचबरोबर कृषी अधिकारी यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतलं. यात त्यांना पेरूच्या फळबागाचा सल्ला मिळाला. त्यांनी दीड एकरमध्ये पेरूची बाग लावण्याचा ठरवलं.
यासाठी त्यांनी तैवान जातीच्या पेरूची कलमं विकत घेतली. चाळीस ते साठ रुपये प्रति नग प्रमाणे ८०० झाडे त्यांनी विकत घेऊन दीड एकर शेतीमध्ये लावली. यासाठी त्यांना वर्षभर संपूर्ण लाख रुपये खर्च आला. वर्षभर मशागत केल्यानंतर पेरूला चांगला भाव मिळाला असून आता राजेंद्र हाके यांच्या बागेत ४०० कॅरेट पेरू झाले आहेत. यातून त्यांना तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्याचबरोबर आणखी दोन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. त्याचबरोबर आता हीच पेरूची झाडे वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणार आहेत असंही ते सांगतात.