पीक विमा भरण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ !

Spread the love

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

शेतकऱ्यांनी आ. निकम यांचे मानले आभार ….

मुंबई – प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी उद्भवत असल्याने त्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेऊन आता पिक विमा भरण्यास ३ ऑगस्ट पर्यंत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीबद्दल शेतकऱ्यांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.

आमदार शेखर निकम यांनी रविवारी प्रधानमंत्री पीकविमा योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले होते. यानुसार राज्यामध्ये यंदा ठिक-ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आल्याने बहुतांश नागरीकांना स्थलांतरीत करावे लागत आहे. रस्ते, विद्युत वाहिनी, इंटरनेट सुविधा पाण्याखाली असून राज्यासह माझ्या मतदारसंघात देखील अनेक गावांचा संपर्क तुटला असून यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेसंदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी उद्भवत आहेत.

अशातच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा ऑनलाईन सादर करावयाची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ऑनलाईन मुदत संपत आल्याने या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात. ही बाब पाहता या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून पिक विमा योजनेची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

या निवेदनाची दखल घेऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या दृष्टीने केंद्र सरकारकडे विनंती करून आता पिक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आ. निकम यांचे आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page