यंदाच्या दिवाळी सणातही या बचत गटांतील महिलांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला व बालकल्याण योजना तथा दीन दयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय उपजीविका अभियान योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बुधवारी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन महानगरपालिका मुख्यालयात
मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. त्याच हेतूने यंदाच्या दिवाळी सणातही या बचत गटांतील महिलांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला व बालकल्याण योजना तथा दीन दयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय उपजीविका अभियान योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बुधवारी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी भेट द्यावी, असे आवाहन नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.
मुख्यालयातील मुख्य इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बुधवारी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कामगारांसाठी हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात एकूण २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. उटणे, अगरबत्ती, जुट बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, मोत्याचे दागिने, साड्या, रांगोळी, परफ्यूम, ड्रेस, लेडीज कुर्तीज्, फॅन्सी कँडल्स, विविध प्रकारचे आकर्षक तोरण, दिवाळीसाठी कंदिल, आकर्षक पणत्या, बांबूच्या आकर्षक वस्तू इत्यादी या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी मांडण्यात येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांची देखील प्रदर्शनात रेलचेल असणार आहे. त्यामध्ये दिवाळी फराळ, पापड, मसाले, चिकन वडे, पुरणपोळी, मोदक असतील. याशिवाय कापडी पिशव्या इत्यादी उत्तम वस्तू प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.
मुंबई महानगरातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना रोजगार मिळावा, महिला बचतगटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी नियोजन विभागाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांत महिला बचत गटांतील सदस्य महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनांनाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.