
नाशिक- मद्यसाठा घेवून धावणाऱ्या अज्ञात वाहनाचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सरकारी वाहन उलटल्याचा प्रकार चांदवड-मनमाड रोडवरील हरनुल टोलनाक्याजवळ घडला. मद्यसाठा घेऊन संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात राज्य उत्पादन शुल्कचा एक कर्मचारी जागीच ठार तर दोघे पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात राज्याकडून नाशिककडे मद्यसाठा घेवून जाणाऱ्या अज्ञात क्रेटा वाहनाचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्कॉर्पिओ वाहनातून पाठलाग सुरु होता. यावेळी संशयास्पदरित्या धावणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचे नियंत्रण सुटले.
नियंत्रण सुटल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाहन अचानक उलटले. या अपघातात एक चालक कर्मचारी जागीच ठार झाला. कैलास गेनू कसबे (50, रा. नाशिक) असे मयताचे नाव आहे. तर राहुल पवार हा पोलीस कर्मचारी या घटनेत गंभीर जखमी झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. हा अपघात चांदवड – मनमाड रस्त्यावरील जुना हरनुल टोल नाक्याजवळ घडला. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.