नवी दिल्ली- देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शुक्रवारी वयाच्या ९८ व्या वर्षात पदार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरूनही आडवाणी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. देशातील प्रशंसनीय मुत्सद्द्यांमध्ये आडवाणी यांचा समावेश होतो. देशाचा विकास पुढे नेण्यासाठी ते नेहमीच समर्पित राहिले. बुद्धिमत्ता आणि समृद्ध दूरदर्शित्वामुळे त्यांचा नेहमीच आदर करण्यात आला. अनेक वर्षे त्यांचे मार्गदर्शन लाभण्याचे भाग्य मला मिळाले. देशाच्या उल्लेखनीय सेवेबद्दल आडवाणी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे हे वर्ष आणखीच विशेष ठरले. त्यांना प्रदीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी प्रार्थना मी करतो, असे मोदींनी म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आडवाणी यांची भेट घेऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शुभेच्छा संदेश जारी करत आडवाणी यांच्या कार्याचा गौरव केला.