उद्योग मंत्रिपदावरुनही भाजपा आणि शिवसेनेत थोडेफार उडाले होते खटके..
मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. तसेच २१ डिसेंबरला खातेवाटपही पार पडले आहे. मागचे व आताचे सरकार महायुतीचे असले तरी मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये बराच फरक आहे. कारण या सरकारमध्ये भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. काही सूक्ष्म बदल करत भाजपाने मोठा भाऊ असल्याचा वरचष्मा कायम ठेवला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातली सुप्त स्पर्धा आहेच. दुसरीकडे भाजपाने मात्र आपले मंत्रिमंडळातील खातेवाटपात वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आल्याने मंत्रालयात सबकुछ भाजपाच असल्याची सनदी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
भाजपाचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपाकडे सर्वाधिक मंत्रिपदं आणि मुख्यमंत्री हे महत्त्वाचे पद राहणार हे सरळ होते. भाजपाकडे २० मंत्रिपदे मिळाली आहेत तर राष्ट्रवादी आणि शिवसेना १२ आणि १० पदे मिळाली आहेत. अशात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही कठीण होते ते खातेवाटपाचे काम असल्याने त्यासाठी जवळपास १५ दिवसांचा कालावधी लागला.
भाजपाच्या एका वरच्या फळीतल्या नेत्यांच्या सूत्रांपैकी एकाने सांगितले की, एकनाथ शिंदे एक पायरी खाली उतरत उपमुख्यमंत्री हे पद घ्यायला तयार झाले. पण भाजपावर त्यांनी दबाव टाकून पाहिला होता. तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी महत्त्वाच्या खात्यांसाठी जास्त आग्रही होती हे कळले. एकनाथ शिंदे यांना कळून चुकले होते की त्यांना मुख्यमंत्री होता येणार नाही. त्यामुळे ते गृहमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र भाजपाने ते पदही आपल्याकडेच ठेवले. त्यानंतर नगर विकास, महसूल आणि पाटबंधारे विभाग ही खाती मागितली गेली. त्यांनी एकूण १३ मंत्रिपदे मागितली होती. तसेच ते उपमुख्यमंत्री होण्यासही शेवटच्या क्षणी तयार झाले होते. भाजपाने त्यांना १२ कॅबिनेट मंत्रिपदे दिली. भाजपाने राम शिंदेंना विधान परिषद अध्यक्ष केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्योग मंत्रिपदावरुनही भाजपा आणि शिवसेनेत थोडेफार खटके उडाले होते. मात्र अखेर हे पद उदय सामंत यांना मिळाले. शिवसेना हे पद आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरली.
भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पद आणि खातेवाटप यावरुन काहीसा संघर्ष झाला याचे एक कारण ठरले ते म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. अजित पवार हे अर्थखात्यासाठी आग्रही होते. तसंच त्यांना आणखी काही मंत्रिपदे हवी होती, जसे की कृषी, महिला आणि बाल कल्याण ही खाती ते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले. नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक पार पडली. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी हे स्पष्ट केले होते की महत्त्वाच्या खात्यांबाबत आम्ही तडजोड करणार नाही. मात्र जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना योग्य वाटा मिळेल. हा वाटा मिळाला आहे यात शंकाच नाही, मात्र भाजपाने त्यांचा शब्द खरा केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र भाजपाने त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे आणि आपणच मोठा भाऊ आहोत हे दाखवून दिले आहे.