
रत्नागिरी- विविध कारणांमुळे व ध्वनी प्रदूषणामुळेसुद्धा लहान मुलांसह ज्येष्ठ व्यक्तींच्या श्रवणक्षमतेत फरक पडत असतो. त्यासाठी श्रवणक्षमतेची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पवई येथील एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलमधील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण यांनी केले.
जागतिक श्रवण दिनानिमित्त त्या बोलत होत्या. अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था (मुंबई), जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यात दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारी धोरणे योजना आणि करिअर मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रम राबवला. डॉ. चव्हाण यांनी श्रवणदोष प्रतिबंध व चांगले ऐकायला येण्यासाठी कानाची घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव होते. कार्यशाळेत अपंगत्व असलेल्या मुलांसह जुळवून घेणाऱ्या कुटुंबासमोरील समस्या व वास्तव या विषयावर सचिन सारोळकर यांनी मार्गदर्शन केले. श्रवणदोष लवकर निदान व लवकर उपचार या विषयावर वाचा उपचारतज्ज्ञ प्राजक्ता भोगटे सातवसे यांनी प्रकाश टाकला, दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना रोजगार आणि स्वयंरोजगार संधी या विषयावर अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण दिव्यांग जनसंस्थेचे व्यवसाय सल्लागार नवनाथ जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.
आस्थाचे समन्वयक संकेत चाळके यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. एव्हीटी थेरपिस्ट वहिश्ताई दाबू यांनी देखील श्रवण व वाचा उपचार याचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक सुरेखा पाथरे यांनी केले. कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक म्हणून अरुण फाटक यांनी काम पहिले. आस्थाच्या संपदा कांबळे यांनी आभार मानले.