
काँग्रेसनं संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळं निरुपम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळं त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे,” असं काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल यांनी एक्स मीडियावर जाहीर केले. विशेष म्हणजे निरुपम यांनी आज (गुरुवारी) निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं होते. त्यापूर्वीच काँग्रेसनं निरुपम यांची हकालपट्टी करत कारवाई केली आहे.
पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी…
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी बुधवारी रात्री सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यात म्हटले की, “शिस्तभंग तसंच काँग्रेस पक्षविरोधी विधानांच्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.” संजय निरुपम यांचं नावं काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये होते. ते देखील काढून टाकण्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच म्हटलं आहे. तसंच नाना पटोले यांनी संजय निरूपम यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत काल दिले होते. त्यानंतर निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.
संजय निरुपम यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून काँग्रेसवर टीका केली. त्यांनी म्हटले, “मी राजीनामा दिल्यानंतर पक्षानं कारवाई केली आहे. अशी त्वरित कारवाई केली, हे चांगलं आहे. याबाबत मी साडेअकरा वाजता ते १२ वाजता भूमिका सांगणार असल्याचं निरुपम यांनी म्हटले आहे.”
स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव काढलं…
लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून निरुपम यांना काढून टाकल्यानंतर त्यांची हकापट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. पटोले यांच्या घोषणेनंतर लगेचच संजय निरुपम यांनी X वर पोस्ट करत पक्ष सोडण्याचा निर्णय स्वतःहून घेणार असल्याचं सांगितलं.
संजय निरुपम निवडणूक लढवण्यास इच्छुक….
“काँग्रेस पक्षानं माझ्यासाठी जास्त ऊर्जा वाया घालवू नये. त्याऐवजी पक्षाला वाचवण्यासाठी त्याचा वापर करावा. पक्ष गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज पूर्ण झाला आहे. उद्या मी निर्णय घेईन,” असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. संजय निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु जागावाटपानंतर ही जागा शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अमोत कीर्तिकर यांच्याकडं गेली. त्यामुळं संजय निरुपम नाराज होते. लोकसभेत 2009 मध्ये उत्तर मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे निरुपम म्हणाले की, “मुंबईत उमेदवार उभे करण्याचा शिवसेनेचा निर्णय म्हणजे काँग्रेसला बाजूला करणे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 25 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेनं 18 जागांवर विजय मिळवला होता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं 19 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांना फक्त चार जागाच जिंकता आल्या होत्या.
शिवसेनेत (शिंदे गट) जाणार?….
काँग्रेसनं संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “संजय निरुपम आणि मी एकमेकांच्या विरोधात आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. जेव्हा संजय निरुपम कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा 3 आमदार पक्ष सोडून गेले. जर आता निरुपम शिवसेनेत (शिंदे गट) येणार असतील तर त्यासाठी माझा विरोध असेल.” तसंच आपली ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवणार असल्याचंही ते म्हणाले.