
डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सरकता जिना मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. उद्वाहन दर दोन दिवसाआड बंद पडते. त्यामुळे पूर्व भागातून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डाॅ. राॅथ रस्त्यावर रेल्वेने गेल्या वर्षी सरकता जिना बसविला आहे. पाटकर रस्त्याच्या कोपऱ्यावर कैलास लस्सी दुकानाजवळ उद्वाहन सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू झाला की राॅथ रस्ता आणि पाटकर रस्ता पाण्याखाली जातो. हे पाणी भूस्तर असलेल्या सरकत्या जिन्याच्या आणि उद्वाहनच्या यंत्रणेत जाऊन ते बंद पडतात. मागील चार महिने् पूर्व भागातील प्रवाशांनी हा अनुभव घेतला.
आता पाऊस गेल्याने रेल्वेने सरकत्या जिन्याची तांत्रिक यंत्रणा दुरूस्तीचे कामे हाती घ्यावे आणि जिना लवकर सुरू करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. काही प्रवाशांना हदयरोग, पायाच्या व्याधी असतात. त्यांना जिने चढताना त्रास होतो. असे प्रवासी सरकत्या जिन्याचा वापर करुन रेल्वे स्थानकात येतात. सरकता जिना सुरू होता त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी सरकत्या जिन्याच्या स्कायवाॅकवरील कोपऱ्यावर उभे राहून जिन्याच्या बटनांमध्ये टाचणी किंवा ती बटणे सतत दाबून जिना बंद पाडतात, असे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
मागील तीन महिन्यांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सरकता जिना बंद असताना रेल्वेचा तांत्रिक विभाग हा जिना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे याविषयी तक्रारी केल्या आहेत. डोंबिवली पूर्व भागातील राॅथ रस्ता, पाटकर रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सरकता जिना, उद्वाहनची रस्त्यालगत असलेली विद्युत यंत्रणा उन्नत करावी. ज्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही सुविधांच्या भूस्तर यंत्रणेत पाणी जाणार नाही, अशी सूचना काही जाणत्या प्रवाशांनी केली .