नवी दिल्ली l 05 जून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एकत्र आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व घटक पक्षांनी बैठकीत समर्थनाची भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाने पत्रे लिहिली आहेत. या बैठकीत नितीश कुमार यांनी लवकरच सरकार स्थापन करावे, असे म्हटले असल्याचे सांगितले जात आहे. आता एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर ज्येष्ठ नेते मोदींसोबत जाऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ ठरावही मंजूर करण्यात आला. या ठरावात म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी निवडणूक लढवली होती आणि आम्ही विजयी झालो. गेल्या 10 वर्षांत देशाचा झपाट्याने विकास होताना प्रत्येकाने पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पुन्हा बहुमत मिळाले आहे. भाजपचे जेपी नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासह एकूण 24 एनडीए नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.
नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर एनडीएचे नेते लवकरच राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे वृत्त आहे. नरेंद्र मोदी 8 जून रोजीच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. आजच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत तुम्ही काम सांभाळत राहा, असे सांगितले.