दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान” अंतर्गत आयोजित मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

Spread the love

दिव्यांगांना सावली देणारे धोरण तयार करणार – बच्चू कडू

ठाणे, : “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील दिव्यांगांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या, अडचणी ऐकून घेत आहोत. त्यातून एक सर्वसमावेशक दिव्यांग धोरण तयार करण्यात येईल. हे धोरण दिव्यांगांना सावली देण्याचे कार्य करेल, असे प्रतिपादन “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” अभियानाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यावेळी केले.
दिव्यांग कल्याण विभागाच्या “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” उपक्रमाच्या ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” उपक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. कडू बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, समाजकल्याण अधिकारी संजय बागूल आदी उपस्थित होते.
श्री.कडू म्हणाले की, देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मागणी मान्य केल्यामुळे हे मंत्रालय अस्तित्वात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या ५ टक्के एवढा निधी दिव्यांगांसाठी देण्यात यावा. तसेच महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी ठेवलेले ५ टक्के निधी खरंच खर्च होतो का, याचा आढावा घ्यावा लागेल. सध्या दिव्यांगांची शिक्षणामधील टक्केवारी कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील मूकबधिर मुलांसाठी इयत्ता १२ वी नंतरच्या शिक्षणाची सोय करायला हवी. ठाणे जिल्हा हा दिव्यांगांच्या सोयी-सुविधा पुरविण्यात अग्रेसर असावा. दिव्यांगांसाठी नवनवीन प्रयोग करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याने नावलौकिक मिळवावा. ठाणे जिल्ह्यातील १०० टक्के दिव्यांगांना युडीआयडी कार्ड मिळावे, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी.
अजिबात चालता न येणारे, झोपून राहणाऱ्या दिव्यांगांची माहिती गोळा करून त्यांच्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याची आवश्यकता आहे. ज्यांना काहीच लाभ मिळत नाही त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांगांच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहावे, असे आवाहनही श्री कडू यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, दिव्यांगांना हक्काने व अभिमानाने जगता आले तरच आपल्या कामाची कर्तव्यपूर्तता होईल. ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांसाठीच्या योजना १०० टक्के राबविण्यात येतील. तसेच दिव्यांग बांधवांसाठी असलेला निधी पुरेपूर व योग्य आणि पारदर्शक पद्धतीने खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल.
प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल म्हणाले की, राज्य शासनाने “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे महत्त्वपूर्ण अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांगापर्यंत पोहचून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. सर्व शासकीय अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना योजनांचा लाभ देतील यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणारआहे. आजच्या मेळाव्यात ॲमेझॉन ही कंपनी ३०० दिव्यांग बांधवांना नोकरी देणार आहे. जिल्हा परिषद ठाणे व प्रगती अंध विद्यालयाने अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीमधील पुस्तिका तयार केली आहे. जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा प्रशासन हे कायम दिव्यांग बांधवांसोबत आहे.

मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद, स्टॉलवर माहितीसाठी गर्दी दिव्यांग कल्याण विभागाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी" उपक्रमाच्या ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रमात सुमारे ४० ते ५० स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, संजय गांधी निराधार योजना, जात, उत्पन्न प्रमाणपत्र, उपप्रादेशिक परिवहन विभाग, यासह विविध महामंडळे, सहाही महानगरपालिका, नगरपालिका यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती यावेळी देण्यात आली. दिव्यांग बांधवांसाठी ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय, पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, जेवण आदींची सोय करण्यात आली होती. त्यासाठी शासकीय कर्मचारी व स्वयंसेवक मदत करीत होते.

विशेष म्हणजे उद्घाटन समारंभ संपल्यानंतर बच्चू कडू यांनी उपस्थित प्रत्येक दिव्यांग बांधवांशी वैयक्तिक संवाद साधित त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री. अशोक भोईर व आंतरराष्ट्रीय अंध महिला फुटबॉल पटू कोमल गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना स्वयंरोजगार पतपुरवठा प्रमाणपत्र, व्हिलचेअर वाटप तसेच वैयक्तिक लाभांचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योजनांची माहिती असलेल्या क्यूआर कोडचे तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या ॲपचे अनावरण करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page