नवीदिल्ली- लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आहेस देशभरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच निवडणुक काळात होणारे गैरप्रकार करताना आढळल्यास, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभणे दाखवल्यास कडक कारवाई होईल, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे.
आगामी निवडणूक काळात हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासमोर मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी आम्ही योग्य ती तयारी केली आहे. त्याप्रमाणे केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत, ड्रोन मार्फत निरीक्षण केले जाईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
राजकीय पक्षांसाठी आम्ही सूचना तयार केल्या आहेत. लहान मुलांना प्रचार करायला लावण्याला सक्त बंदी आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी फुकट वस्तू वाटत असेल तर कारवाई होईल. कुठे पैसा, दारु, कुकर वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲपवर टाका, तुमच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून १० मिनिटात आमची टीम तिथे पोहोचेल, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच प्रचार काळात टीका- टिप्पणी करु शकता. मात्र कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल, धार्मिक तेढ होईल असे वक्तव्य, द्वेष वाद किंवा भावना दुखावणारे वक्तव्य केल्यास, आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई होईल. अशी विधाने टाळावीत, असेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे