गृहमंत्रीपद मिळणार नाही, भाजपकडून एकनाथ शिंदेंना निरोप? एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? पाहणे महत्वाचे ठरणार…

Spread the love

मुंबई- राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण? याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. अशातच आता राज्याच्या गृहमंत्रीपदावरुन भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचे समजते आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर दुसऱ्या सन्मानजनक खात्यांची मागणी केली आहे. यामध्ये गृहमंत्रीपदासाठी ते आग्रही असल्याचे समोर आले होते. उपमुख्यमंत्रीपद न देता गृहमंत्रीपद द्यावे, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. मात्र त्यांची ही मागणी भाजपने फेटाळल्याची चर्चा आहे. भाजपकडून  एकनाथ शिंदे यांना गृह मंत्रालय तसेच उर्जा खाते देण्यास विरोध असल्याचे समजते आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री, उर्जामंत्री तसेच जलसंपदा खाते यासाठी आग्रही आहेत मात्र त्यांना गृह मंत्रालय मिळणार नाही, असा थेट संदेश भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीकडेच गृह मंत्रालय ठेवण्यात येणार असून एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपदाची मागणी केल्याचे सांगण्यात येत होते. या दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे हे सर्व कार्यक्रम रद्द करुन त्यांच्या दरे गावी मुक्कामी गेले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात येत असून आज ते मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page