शरद पवारांच्या निकटवर्तीय माजी खासदारावर ED ची मोठी कारवाई, 315 कोटींची संपत्ती जप्त..

Spread the love

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि माजी राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छसह तब्बल ७० ठिकाणच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ईडीने ७० ठिकाणच्या मालमत्तांसह पवन चक्क्या, चांदी आणि हिरेजडीत दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्तेची बाजारभावानुसार किंमत ३१५.६० कोटी रुपये इतकी आहे.

मनी लॉंडरिंग प्रकरण काय?

बँक घोटाळा प्रकरण मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा.लि. विरुद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित ज्वेलर्स प्रा.लि., मे. आर एल गोल्ड प्रा.लि., मे. मनराज ज्वेलर्स प्रा. लि. आणि इतरांविरुद्ध पीएमएल २००२ कायद्यातंर्गत ही कारवाई केली गेली आणि १३ ऑक्टोबर रोजी ही संपत्ती जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या स्थायी आणि अस्थायी मालमत्तांमध्ये प्रमोटर्स माजी राज्यसभा खासदार ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी यांच्याही आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्याचबरोबर मुलगा मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि अन्य इतरांकडील बेनामी मालमत्तांचाही समावेश आहे.

ईडीची या प्रकरणात कशी झाली एन्ट्री?

भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये सीबीआयने दाखल केलेल्या ३ एफआयआरच्या आधारावर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यात असा आरोप आहे की, या कंपन्या आणि त्यांचे संचालक व प्रमोटर्स गुन्हेगारी कट, फसवणूक, दिशाभूल आणि गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी आहेत. ज्यामुळे भारतीय स्टेट बँकेला तब्बल ३५२.४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ईडीने केलेल्या तपासातून असे समोर आले आहे की, प्रमोटर्संनी कर्ज घेण्यासाठी बोगस आर्थिक कागदपत्रे सादर केली होती. प्रमोटर कंपन्यांच्या लेखा परिक्षकांशी मिलीभगत केली. रिअल इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी आरोपी कंपन्यांच्या खात्यांमध्ये खोट्या खरेदी-विक्रीच्या नोंदी केल्या होत्या. खोट्या व्यवहाराच्या नोंदी करत होत्या.
ईडीने टाकल्या होत्या धाडी
यापूर्वी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यात राजमल लखीचंद समूहाच्या १३ अधिकृत आणि निवासी मालमत्तांवर धाडी टाकून झाडाझडती घेतली होती. अनेक कागदपत्रे आणि सोने, चांदी, हिरेजडीत दागिने आणि रोख रक्कम ईडीने जप्त केली होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page