
ठाणे(शांताराम गुडेकर ) गेली अनेक वर्ष पत्रकारीतेत काम करणारे संपादक मुनीर खान(दै. झुंजार केसरी )यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांच्या सहकार्यातून सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले पाहिजेत या विषयी तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये झुंजार केसरीचे संपादक मुनीर खान यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ कवी विसुभाऊ बापट, राजन लाखे, अभिनेते निमिष कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, डाॅ आशिष धडस आदी मान्यवर उपस्थित होते.