दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं गुरुवारी अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दिल्ली न्यायालयानं केजरीवाल यांना सहा दिवसांची म्हणजेच 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला. शुक्रवारी ‘आप’च्या वतीनं देशभरात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं होतं. यावेळी पोलिसांनी ‘आप’च्या मंत्री आतिशी, सौरव भारद्वाज यांना ताब्यात घेतलं होतं
केजरीवालांना ईडी कोठडी….
अटकेपासून संरक्षण नाकारलं होतं…
दिल्ली न्यायालयात शुक्रवारी दिवसभर अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणावर सुनावली झाली. अखेर रात्री आठ वाजता केजरीवाल यांना न्यायालयानं 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना पुढील सहा दिवस ईडीच्या कोठडीत राहावं लागणार आहे. ईडीनं केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडं मागितली होती. तर केजरीवाल यांच्यावतीनं कोठडी न देण्याची मागणी केली होती.
दिल्ली दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना या अगोदरच अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीनं या अगोदर तब्बल 9 वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, ईडी चौकशीला न जाता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलन सुरू केलं.
मंत्री आतिशी, सौरव भारद्वाज यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीनं दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आतिशी, सौरव भारद्वाज यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. “पोलिसांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या आपच्या नेत्या तथा मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज यांना ताब्यात घेतलं आहे. आपच्या नेत्यांनी आंदोलन करु नये, यासाठी पोलिसांनी गुरुवारपासूनच त्यांना नजरकैदेत ठेवण्यास सुरुवात केलं,” असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे.