अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोमवारी (30 सप्टेंबर) दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुर्जी तालुका भूकंपाच्या धक्क्यानं हादरल्याची माहिती समोर आली. सोमवारी (30 सप्टेंबर) दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मेळघाटातील अनेक गावात खळबळ-
भूकंपाचे धक्के बसताच मेळघाटातील अनेक गावात खळबळ उडाली. चिखलदरा मोथा, सलोना चौराकुंड, सेमाडोह, हरीसाल या भागात भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. घराशेजारी काहीतरी जोरदार पडलं असावं, असा भास होताच गावातील महिला, पुरुष, लहान मुलं सर्वजण घराबाहेर धावत आल्याची माहिती मोठा येथील रहिवासी गजानन शनिवारे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली. धामणगाव गडी या गावात देखील भूकंपाचे धक्के बसताच खळबळ उडाली. गावातील सर्व नागरिक मोकळ्या जागेवर धावत एकत्र आल्याची माहिती धामणगाव गढी येथील रहिवासी रमेश जोशी यांनी दिली. अंजनगाव सुर्जी शहरात देखील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
अमरावतीत भूकंपाचे धक्के-
अचलपूरपासून 400 मीटरवर केंद्र : भूकंपाचा सर्वाधिक हादरा हा अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांना बसला. भूकंपाचं केंद्र हे अचलपूर पासून 400 मीटर अंतरावर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. दरम्यान भूकंपाचे धक्के बसल्यामुळं अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी या चारही तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
भूकंपामुळं हानी नाही-
मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली. अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलं नाही.