
रत्नागिरी : महिन्यांचे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले, त्यामुळे दुधाअभावी त्याची उपासमार झाली. कळपापासून लांब गेले, त्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिलाचा शवविच्छेदन अहवाल वनखात्याला मिळाला असून, त्यात उपासमार आणि मानसिक ताण हेच कारण नमूद करण्यात आले आहे.
देवमाशाच्या पिलाला सुखरूप समुद्रात सोडण्यासाठी शेकडो हात मदतीसाठी पुढे झाले. मात्र, त्यानंतरही त्या पिलाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरुवारी या पिलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून उपासमार आणि मानसिक ताण ही दोन कारणे पुढे आली आहेत. वन खाते, महसूल खाते, मालगुंड आणि गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच कर्मचारी, परगावाहून आलेले पर्यटक आणि असंख्य ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
सोमवारी सकाळपासून मंगळवारी रात्रीपर्यंत या पिलाला वाचविण्यासाठी आणि खोल समुद्रात पाठविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. मंगळवारी रात्री ते पिल्लू खोल समुद्रात गेलेही. मात्र, बुधवारी ते परत आले, तेही मृतावस्थेत गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले.
देवमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिले २ वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. सगळेच मासे कळपाने राहतात. देवमासाही कळपानेच वावरतो. मात्र, आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणाच्या भावना देवमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.
▪️आई करून देते शिकार
देवमाशाची पिल्ले तीन २ वर्षांची होईपर्यंत आईचे दूध पितात आणि त्याचवेळी त्यांची आई त्यांना छोट्या माशांची शिकार करून देते. माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. कळपातच या माशांना छोट्या माशांच्या शिकारीचे प्रशिक्षणही मिळते. तीन वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वतःच शिकार करून खातात.
▪️देवमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनाऱ्यावर आलेले पिल्लूच तीन ते साडेतीन टन वजनाचे होते. असे वजनदार मासे पाण्यात स्वतःचे वजन आरामात पेलतात. मात्र, जेव्हा ते किनाऱ्यावर येतात किंवा वाळूत अडकून राहतात, तेव्हा त्यांचे हे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशावेळी त्यांचे फुफ्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते.
➡️ – प्रा. स्वप्नजा मोहिते, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव.
▪️ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले किंवा आपल्या कळपाबाहेर गेले तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या, कळपाबाहेर गेलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अधिक गतीने हालचाल करणे गरजेचे असते .
➡️- राजश्री कीर, परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण