मुसळधार पावसाचा फटका, रायगड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर..

Spread the love

मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. फक्त रायगड नाही तर नागपूर जिल्ह्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तर पूर परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. मार्केट पाण्याखाली गेलं आहे. चंद्रपूरमध्ये तर भीषण अवस्था झाली आहे. तसेच कोकणातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना आज पावसाने चांगलंच झोडपलं आहे. असं असताना रायगडमधील काही तालुक्यांमध्ये पाऊस थांबायचं नाव घेताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घ्यात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 22 जुलैला महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा आदेश जसाचा तसा…

“ज्याअर्थी, उक्त नमुद अ.क्र. ४ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.”

“भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २१/०७/२०२४ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. वरील सर्व बाबी तसेच तहसीलदार महाड, पोलादपूर, माणगांव, कर्जत यांच्या दिनांक २१/०७/२०२४ रोजीच्या अहवालाचे अवलोकन करता महाड, पोलादपूर, माणगांव, कर्जत या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालये यांना दि. २२/०७/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे.”

“त्याअथी, मी, किशन ना. जावळे, जिल्हाधिरी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाड, पोलादपूर, माणगांव, कर्जत या तालुक्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २२/०७/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.”

“तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी. सदरहू आदेश आज दिनांक २१/०७/२०२४ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.”

नागपुरातही शाळांना सुट्टी जाहीर
सोमवारी, २२ जुलै रोजीही पावसाचा धोका वर्तविण्यात आला आहे. पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळविण्यात आले आहे. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे आज शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर…

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तर भंडाऱ्यात जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा कहर पाहता भंडारा जिल्ह्यात शाळांना सुुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याच्या परिमाण शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयाला उद्या सुट्टी जाहीर केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page