भेगा वाढल्यामुळे रस्ता बंद होण्याची शक्यता तसेच वस्तीलाही धोका होण्याची शक्यता
संगमेश्वर- अतिवृष्टीमुळे माभळे काष्ट्येवाडी येथे जमिनीला 1किमी अंतरापर्यत मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचला आहे. डोंगरावरील माती कधीही सरकण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यास धोका होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काष्ट्येवाडी येथे मोठ्या भेगा पडल्याचे समजल्यानंतर माभळे गावचे मंडळ अधिकारी अमर चाळके ,गावचे तलाठी संदेश घाग, कोतवाल अमर जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तसेच यासंदर्भात भूगर्भ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यासंदर्भात अहवाल दिल्याचे मंडल अधिकारी अमर चाळके यांनी संगमेश्वर न्यूजशी बोलताना सांगितले
अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असुन असाच एक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील माभळे गावातील काष्ट्येवाडी येथे झाला असून रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडले आहेत. त्या मुळे पुढील गावासाठी या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका असून दिवसभरात भेगा वाढत असून त्या रुंदावल्या जात असल्याने भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माभळे हे गाव मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून हाकेच्या अंतरावर असलेला महामार्गला जोडून असलेला मुख्य रस्ता असून गेले काही दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे माभळे काष्टेवाडी वस्ती पासून काही अंतरावर रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडण्याच्या घटना घडत असून काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला असून खचलेला हा भाग 7 फुटापर्यत सरकला आहे. सकाळी अस्पष्ट दिसणारे तडे संध्याकाळ पर्यंत वाढत जाऊन काही प्रमाणात रुंदावल्या आहेत. रस्ताला मोठा फटका बसला असून डोंगर भागातून 1 किमी अंतरापर्यत तडा गेला आहे.रस्त्याला तडे गेल्याने माभळे गवळवाडी, उजगाव गवळवाडी,पिंगळेवाडी, बडदवाडी,नांदलज घनगरवाडी आदी पुढील गावासाठी हा रस्ता वाहन वर्दलीसाठी डोकादायक तर बनला आहेच परंतु भेगा वाढत जाऊन भूस्खलन झाल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.